बेकायदा वृक्षतोड प्रकरण भोवल; दौंडचे वनपाल रवींद्र मगर, वनरक्षक कदम निलंबित | पुढारी

बेकायदा वृक्षतोड प्रकरण भोवल; दौंडचे वनपाल रवींद्र मगर, वनरक्षक कदम निलंबित

रावणगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्याच्या पुर्व भागातील मलठण, राजेगाव ,वाटलुज, नायगाव या भागातील वनक्षेत्रातील वनजमीनीतून बेकायदा वृक्षतोड, कोळसा खाणी आणि बेकायदा माती उत्खनन सुरू होते. या प्रकरणी पुणे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दौंड चे वनपाल रवींद्र धनाजी मगर व वनरक्षक किरण कदम यांना निलंबित केले आहे.अशी माहिती पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांनी दिली.

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण, वाटलुज , नायगाव, राजेगाव या गावांमधील भीमा नदीच्या पट्ट्यातील वन विभागाच्या वनक्षेत्रात तसेच उजनी संपादित केलेल्या क्षेत्रात मागील काही दिवसांपासून बेकायदा वृक्षतोड सुरू होती. तर राजेगाव, वाटलुज ,नायगाव या भागात दहा ते पंधरा बेकायदा कोळसा भट्ट्या सुरू होत्या. या बाबत मलठण ग्रामस्थांनी दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे कारवाईची लेखी मागणी केली होती. मात्र दौंड तालुका वन परिक्षेत्राधिकारी कल्याणी गोडसे यांच्यासह या भागातील वनपाल व वनरक्षक यांनी प्रकरणाची दखल घेतली नाही. उलट बेकायदा वृक्षतोड करणारे आणि बेकायदा कोळसा भट्ट्या मालकांना पसार होण्यास मदत केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे तर सोडा साधी चौकशी देखील केली गेली नाही.

असा आरोप करीत मलठण ग्रामस्थांनी दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांच्यावर कारवाई करण्याची लेखी तक्रार मलठण ग्रामस्थांनी पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांच्याकडे केली होती. या तक्राराची त्वरित दखल घेत आणि घटनेचे गांभीर लक्षात घेऊन पुणे वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांनी बुधवारी ( दि. ७) तालुक्यातील मलठण, राजेगाव, नायगाव, वाटलुज या भागातील वनक्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्था सोबत या परिसराची पाहणी केली. या भागातील वन विभागाच्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून वनक्षेत्राचे मोठे नुकसान केल्याचे यावेळी निदर्शनास आले होते. तर काही ठिकाणी बेकायदा कोळसा भट्ट्या तसेच बेकायदा माती उत्खनन केल्याचे हे पाहणी दरम्यान दिसून आले होते.

यावेळी संबंधित बेकायदा वृक्षतोड करणारे तसेच संबंधितावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या वनपाल, वनरक्षक व तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावरही गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी पवार यांच्याकडे केली होती.वरिष्ठ वन अधिकारी पवार यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते . त्यानुसार पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहायक उपवनसंरक्षक दिपक पवार यांनी शुक्रवारी ( दि. ९) दौंड वनपरिक्षेत्रातील दौंड परिमंडळातील राजेगाव नियतक्षेत्रातील राजेगाव, मलठण, नायगाव, वाटलुज या गावातील राखीव वनक्षेत्रात अवैध वृक्षतोडी अंदाजे क्षेत्र ५.५५१ हेक्टर आणि माती उत्खनन २३१३ घ.मी. झाले आहे.

दौंड वनपाल रवींद्र मगर व राजेगाव चे वनरक्षक किरण कदम यांचे त्यांचे कार्यक्षेत्रातील कामावर तसेच वनसंरक्षणावर नियंत्रण नाही. प्रस्तुत प्रकरणी सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याने, चौकशीमध्ये तपासामध्ये अडथळा निर्माण होण्याचा संभव आहे, म्हणून दौंड वनपाल रविंद्र मगर व वनरक्षक किरण कदम यांना निलंबन करणेत येत आहे.असा आदेश देण्यात आला आहे.
दै.पुढारी ने फोडली होती वाचा

याबाबत दै. ‘पुढारी’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून या प्रकरणाला वाचा फोडली होती. पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्याने मलठण ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. वनविभाने संबंधित बेकायदा वृक्षतोड करणारे मुख्य सुत्रधार आणि कोळसा भट्ट्या मालकांवर ही गुन्हे दाखल करून अटक करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

हेही वाचा

Back to top button