Abhishek Ghosalkar Firing Case | अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी मॉरिस नोरोन्हा याच्याविरद्ध गुन्हा नोंद | पुढारी

Abhishek Ghosalkar Firing Case | अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी मॉरिस नोरोन्हा याच्याविरद्ध गुन्हा नोंद

पुढारी ऑनलाईन : दहिसर गोळीबारप्रकरणी पोलिसांनी मृत आरोपी मॉरिस नोरोन्हा याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंद केला आहे. ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी आयपीसीच्या कलम ३०२, शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (१) (A), आणि १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. (Abhishek Ghosalkar Firing Case)

शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार आणि उपनेते विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांची गुरुवारी संध्याकाळी ‘फेसबुक लाईव्ह’ सुरु असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा हा एकेकाळचा शत्रू अचानक मित्र बनला आणि आपल्या घरी कार्यक्रमाला निमंत्रित करून त्यानेच अभिषेक यांचा घात केला. हा घातपात घडवल्यानंतर मॉरिसनेही स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून घेत जीवन संपवले. (Abhishek Ghosalkar Firing Case)

दरम्यान, अभिषेक घोसाळकर यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी मुंबईतील बोरिवली येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेच्या नेत्यांचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत.

उल्हासनगरात गेल्याच आठवड्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात शिंदे सेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. ६ गोळ्या शरीरात घुसल्याने महेश सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेने भयचकित झालेल्या महाराष्ट्राचा दहिसरमधील घोसाळकर हत्येने अक्षरशः थरकाप उडवला.

कोण आहे मॉरिस?

मॉरिस हा भाजपचे आमदार सुनील राणे यांचा समर्थक समजला जातो. मात्र तो शिंदे सेनेत जाण्याच्या विचारात होता. तो महापालिका निवडणुकीचीही तयारी करत होता. त्याच्या दहिसरच्या आयसी कॉलनीतील कार्यालयावर वोट फॉर मॉरिस भाई असे फलक आतापासूनच लागलेले आहेत. या परिसरात तो मॉरिसभाई म्हणून परिचित होता. तो स्वतःला समाजसेवक म्हणून परिचित होता. या राजकीय वाटचालीत मॉरिसची दुश्मनी झाली ती घोसाळकरांशी. मॉरिसविरुद्ध एमएचबी पोलीस ठाण्यात लैगिंक अत्याचाराचा एक गुन्हा दाखल झाला. याच गुन्ह्यांत दीड वर्षे जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर त्याला कोर्टाने जामिन मंजूर केला होता. अभिषेक घोसाळकरांमुळेच आपल्याला जेलची यात्रा घडली असा संशय मॉरीसला होता. बाहेर आल्यानंतर या अटकेचा बदला घ्यायचा असा कट त्याने रचला असावा.

त्यासाठी त्याने रचले राजकीय मैत्रिचे नाटक

मॉरीसच्या निमंत्रणावरून गुरुवारी सायंकाळी अभिषेक घोसाळकर शेजारीच असलेल्या मॉरीसच्या आयसी कॉलनीतील कार्यालयात गेले. दोघांनी आपसांतील वाद मिटवून पुन्हा एकत्र काम करण्याचा निर्धार केला. त्यानंतर दोघेही फेसबुक लाईव्हवर आले आणि या संवादाची अखेर मॉरीसच्या गोळीबाराने केली.

फेसबूकवरील संवाद आटोपून बाहेर मॉरीसने जमवलेल्या गोरगरीबांना रेशन आणि साड्या वाटप करण्यासाठी घोसाळकर सोफ्यातून उठले आणि आधीच उठून दारात उभ्या मॉरीसने त्यांच्यावर अतिशय जवळून पाच गोळ्या झाडल्या. त्यानंतर आपल्या कार्यालयातच मॉरीसनेही गोळी झाडून घेत स्वतःला संपवले.

जखमी झालेल्या अभिषेकला करुणा रुग्णालयात तर मॉरीसला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मॉरीसला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका आल्याने अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला.

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येने दहिसरमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घोसाळकर यांच्या कार्यकर्त्यांन मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.

दोन वेळा नगरसेवक

अभिषेक घोसाळकर हे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सध्या त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर या नगरसेवक होत्या. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे ते उमेदवार होते. त्यांनी एमएचबी कॉलनी, आयसी कॉलनी हा मतदार संघ बांधून ठेवला होता. त्यांचा या विभागात चांगला संपर्क होता.

ठाकरे गटाने फोडले कार्यालय

अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर आरोपी मॉरिस याचे आयसी कॉलनीत असलेले कार्यालयात संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली.

फेसबुक लाईव्हवर राजकीय हत्येचा थरार

मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर एकेकाळचेकट्टर शत्रू. पण ते गुरुवारी अचानक एकत्र आलेले दिसले. मॉरिसभाईच्या घराबाहेर अन्नधान्य-साडीवाटपाचा कार्यक्रम होता. त्यासाठी मॉरिसने अभिषेक घोसाळकरांना निमंत्रण दिले. मॉरिसच्या घरात शेजारी बसून आधी दोघांनी फेसबुक लाईव्ह करत आपल्या भागातील लोकांशी संवाद साधला आणि याच संवादाच्या शेवटी मॉरिसने अभिषेक यांना गोळ्या घातल्याचे लाईव्ह दिसले. मुंबईच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात फेसबुक लाईव्हवर प्रथमच झालेल्या या राजकीय हत्येने महाराष्ट्राच्या अंगावर सरसरून काटा आला आहे.

फेसबुक लाईव्ह दरम्यान मॉरिस भाई हा अभिषेक यांच्या बाजूच्याच सोफ्यावर बसला होता. आपल्याला एकत्र पाहून अनेक लोकांना आश्चर्य वाटेल असे मॉरिस म्हणतो. आयसी कॉलनीसाठी आपण एकत्र आलो पाहिजे. चांगलं काम केलं पाहिजे. आज आम्ही ठरवलंय की साड्या वाटायच्या, राशन वाटायचं, अभिषेकभाई आणि आम्ही नाशिक ट्रिपच्या बसेस करायचे ठरवल्याचेही मॉरिसभाई सांगतो. अभिषेक भाई फार बीझी असतात. त्यांच्याकडे फार वेळ नाही, पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असेही तो म्हणतो. मॉरीसनंतर अभिषेक घोसाळकरांनी संवाद साधला. आताच आपण सांगितले की आपण एकत्र येणार आहोत चांगला दृष्टीकोन ठेवून आणि एकत्र राहून चांगलं काम करायचं आहे… (मध्येच मॉरीस भाई उठून जातो) मला वाटतं आपण चांगल्या कारणांसाठी पुढे गेलं पाहिजे. लोकांचं भलं केलं पाहिजे. लोकांचा फायदा कोणत्या गोष्टीत आहे हे आपण पाहिलं पाहिजे. मला वाटतं आज एक चांगला निर्णय मॉरीस भाईने घेतला आहे. आज साडी, फळ आणि धान्य वाटण्याचं काम करण्यात येणार आहे, असं अभिषेक घोसाळकर म्हणत असतानाच मॉरीस भाई परत येतो… आम्ही दोघं हे एकत्रितपणे करणार असल्याचं म्हणतो. त्यावर अभिषेक स्मित हास्य करताना दिसत आहेत.

आधी मॉरीस भाई उठतो. काही सेकंदानंतर अभिषेक घोसाळकर बाहेर कार्यक्रमाला जाण्यासाठी उठतात. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असते. ते मोबाइलकडे पाहत असतानाच अत्यंत जवळून पाच गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात येतात. प्रचंड धक्का बसलेले अभिषेक घोसाळकर स्वतः लाच सावरण्याचा प्रयत्न करतात पोटावर गोळी लागताच त्यांनी पोटाला हात लावला आणि मोबाइल खुर्चीवर टाकून ते पळण्याचा प्रयत्न करत असतानाच आणखी दोन गोळ्या त्यांना लागतात. पुढचे दृष्य कॅमेरेंच्या फ्रेममध्ये नाही. मात्र नंतर आणखी दोन गोळ्या घातल्याचे आवाज येतात. (Abhishek Ghosalkar Firing Case)

 हे ही वाचा :

Back to top button