एसटीला फिरविले मेट्रोने; अर्धवट कामांमुळे प्रशासनासह प्रवाशांनाही त्रास | पुढारी

एसटीला फिरविले मेट्रोने; अर्धवट कामांमुळे प्रशासनासह प्रवाशांनाही त्रास

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मेट्रोच्या स्थानकासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड आगाराची जागा घेऊन त्या मोबदल्यात स्थानकाच्या नूतनीकरणासाठी साडेचार कोटींची कामे करण्याचे करारात ठरले होते. त्यानुसार, आगारात ही कामे केल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र आगारात अर्धवट कामे झाल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार, एका अर्थाने एसटी प्रशासनाला मेट्रोनेच फिरविल्याचे दिसून येत आहे. आगारातील झालेल्या अर्धवट कामांमुळे अधिकारी, कर्मचार्‍यांसह प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

मेट्रो प्रशासनाने संत तुकारामनगर मेट्रो स्थानक उभारण्यासाठी एस. टी. महामंडळाची चार हजार चौरस मीटर जागा घेतली. या मोबदल्यात पिंपरी-चिंचवड आगाराचे नूतनीकरण आणि काँक्रिटीकरण करून देण्याचा करार मेट्रो प्रशासनाने केला आहे. आगारात पूर्ण काँक्रिटीकरण, रंगरंगोटी, वॉटरप्रूफिंग, फरशी बसवणे, डागडुजीसह इतर कामे करण्याचे नमूद केले होते. त्यानुसार, पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर 6 मार्च 2022 रोजी मेट्रो सेवा सुरूही झाली. ती सुरू झाल्यानंतर मेट्रो प्रशासनाकडून मागील वर्षी आगारात काँक्रिटीकरणाचे काम सुरू केले. हे काम डिसेंबरपर्यंत सुरू होते.

पण, मागील एक ते दीड महिन्यापासून काम बंद आहे. हे काम अर्धवट झाले आहे. काम अर्धवट केल्यामुळे आगारात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. आगारात इतर कोणतेही काम सुरू झालेले नाही. या आगारातून दररोज मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र येथील 327, तर मुंबईहून येणार्या 183 एस. टी. बसेस ये-जा करतात. पिंपरी-चिंचवड आगाराच्याही 30 बसेस येथून सुटतात. शहराचा औद्योगिक विकास झाल्यामुळे या आगारातून प्रवास करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु प्रवाशांना आगारातील दुरवस्थेचा सामना करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड आगाराच्या नूतनीकरणासाठी साडेचार कोटींची कामे करण्याचा करार करण्यात आला होता. त्यानुसार, ही कामे झाली आहेत.

– हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, मेट्रो

एसटीच्या वल्लभनगर आगारातील कामे अर्धवट स्वरूपात आहेत. अतिशय संथ गतीने कामे केल्याने प्रशासनासह प्रवाशांनाही याची झळ सोसावी लागली आहे. याबाबत वरिष्ठांना कळविले असून पाठपुरावा केला जात आहे.

– कैलास पाटील, विभाग नियंत्रक, पुणे एसटी विभाग.

हेही वाचा

Back to top button