टीडीआर घोटाळा प्रकरण : संभाजी ब्रिगेडचे साखळी उपोषण | पुढारी

टीडीआर घोटाळा प्रकरण : संभाजी ब्रिगेडचे साखळी उपोषण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वाकड येथील 1500 कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याला प्रशासनाकडून स्थगिती दिली, मात्र दोषी अधिकार्‍यांवर कारवाई होत नसून, त्यांचे संरक्षण केले जात असल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पिंपरी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली. याबाबत संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी प्रसिध्दीपत्रकात असे म्हटले की, वाकडमधील टीडीआर घोटाळा उघडकीस येऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या घोटाळ्याचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात उमटले होते, त्यानंतर या प्रकरणाला स्थगिती देण्यात आली होती. या घोटाळ्यातील दोषी असलेले महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर अद्याप कारवाई करण्यात आली नाही.

म्हणून महापालिका भ्रष्ट अधिकार्‍यांना वाचवत असल्याचे दिसून येत असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, त्यांना पदावरुन निलंबीत करावे. या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने पाठपुरावा करत महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात केले होते. तरी कारवाई न झाल्याने आता बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. या वेळी साखळी उपोषणात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लहू लांडगे, शहर कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, उपाध्यक्ष रावसाहेब गंगाधरे सचिव नकुल भोईर जिजाऊ ब्रिगेडच्या कल्पना गिड्डे, मोनल शिंत्रे,पांडुरंग प्रचंडराव, ड.मोहन अडसूळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, विशाल जाधव आदींसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होते.

हेही वाचा

Back to top button