US | अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, या वर्षातील चौथी घटना | पुढारी

US | अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, या वर्षातील चौथी घटना

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेत (US) भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची आणखी एक घटना समोर आली आहे. या वर्षातील ही चौथी घटना आहे. इंडियाना राज्यातील पर्ड्यू विद्यापीठात २३ वर्षीय मूळ भारतीय वंशाच्या वैद्यकीय विद्यार्थ्याचा सोमवारी जंगलात मृतदेह आढळून आला आहे. पर्ड्यू विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे आणि या वर्षातील अमेरिकेतील चौथी घटना आहे.

वॉरेन काउंटी कॉरोनर जस्टिन ब्रुमेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर कामथ या विद्यार्थ्याचा मृतदेह क्रोज ग्रोव्ह नेचर प्रिझर्व्ह येथे संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. समीरने ऑगस्ट २०२३ मध्ये पर्ड्यू येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले होते. तो त्याच विभागात पुढील शिक्षण घेत होता. कॉरोनर कार्यालयाने सांगितले की, कामथ यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे.

समीरच्या मृत्यूबाबत वॉरेन काउंटी कॉरोनर कार्यालय आणि शेरीफ कार्यालयाकडून तपास केला जात आहे. क्रॉफर्ड्सविले येथे मंगळवारी दुपारी (स्थानिक वेळ) शवविच्छेदन होणार होते.

अमेरिकेतील (US) जॉर्जियामध्‍ये २५ वर्षीय भारतीय विद्यार्थी विवेक सैनी याची एका बेघर माथेफिरुने हत्‍या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना इंडियाना राज्यातील पर्ड्यू विद्यापीठात (Purdue University in Indiana state of the US) शिकत असलेल्या नील आचार्य (Neel Acharya) या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. पर्ड्यू विद्यापीठाच्या जॉन मार्टिनसन ऑनर्स कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्समध्ये दुहेरी शिक्षक घेत असलेला हा विद्यार्थी सोशल मीडियावर बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये सापडला होता.

या वर्षाच्या सुरुवातीला एका घटनेत जॉर्जियामध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या २५ वर्षीय भारतीय विद्यार्थी विवेक सैनी याच्यावर तो काम करत असलेल्या स्टोअरमध्ये एका बेघर माथेफिरुने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात माथेफिरुने सैनी याच्यावर हातोड्याने ५० वार केले होते. ही धक्कादायक घटना व्हिडिओमध्ये कैद झाली होती.

गेल्या आठवड्यात श्रेयस रेड्डी हा भारतीय विद्यार्थी सिनसिनाटी, ओहायो येथे मृतावस्थेत आढळला होता. न्यू यॉर्कमधील भारतीय दूतावासाने रेड्डी यांच्या मृत्यूची माहिती दिली होती. (US)

शिकागोमध्ये भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला

अमेरिकेतील शिकागो येथे आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर सशस्त्र लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सय्यद मजहीर अली असे या भारतीय विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळचा हैदराबादचा आहे. त्याच्या कुटुंबीयांनी भारत सरकारने हस्तक्षेप करून त्याला योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी केली आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा :

Back to top button