जॉर्जियामध्ये बेघर माथेफिरुने केली भारतीय विद्यार्थ्याची हत्‍या | पुढारी

जॉर्जियामध्ये बेघर माथेफिरुने केली भारतीय विद्यार्थ्याची हत्‍या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेतील जॉर्जियामध्‍ये २५ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची एका बेघर माथेफिरुने हत्‍या केल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. विवेक सैनी असे हत्‍या झालेल्‍या विद्यार्थ्याचे नाव असून, एक बेघर माणसाने त्‍याच्‍यावर हातोड्याने हल्‍ला केल्‍याचे ‘सीसीटीव्‍ही’मध्‍ये कैद झाल्‍याचे वृत्त ‘इंडिया टूडे’ दिले आहे. ( Indian student killed in Georgia  )

हातोडयाने डोक्‍यावर ५० वार

२५ वर्षीय  विवेक सैनी हा जॉर्जियामध्‍ये एका फूड मार्टमध्ये लिपिक म्‍हणून काम करत होता. फूड मार्डमध्‍ये ज्युलियन फॉकनर या बेघराला विवेकसह अन्‍य कर्मचार्‍यांनी दोन दिवस आश्रय दिला होता. त्‍याला खाद्‍यपदार्थांसह एक जॅकेटही त्‍यांनी दिले होते. १६ जानेवारीला विवेक याने फॉकनरला फूड मार्टमधून जाण्‍यास सांगितले. तसेच त्‍याने पोलिसांना बोलविण्‍याचाही इशारा दिला. यानंतर विवेक घरी जात असताना फॉकनरने त्‍याच्‍यावर हातोड्याने हल्ला केला. त्‍याने विवेकच्या डोक्यावर सुमारे ५० वार केले. पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेत फॉकनरला ताब्‍यात घेतले.

हरियाणातील बरवाला येथील विवेक सैनी याने चंदीगड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक पूर्ण केले होते. यानंतर अलाबामा विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. विवेकची चुलत बहीण सिमरन हिने ‘इंडिया टुडे’ला सांगितले की, विवेक हा हुशार विद्यार्थी होता. तो जॉर्जियातील एका फूड मार्टमध्‍ये नोकरी करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून ज्युलियन फॉकनर हा फूड मार्टमध्‍ये होते. विवेक त्याला सिगारेट द्यायचा, पण त्यादिवशी त्याने नकार दिला. तसेच पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्‍याचाही इशारा दिला. ज्युलियन फॉकनर हा अंमली पदार्थांच्‍या आहारी गेला होता तसेच तो मनोरुग्‍णही आहे.

हेही वाचा : 

Back to top button