Jadeja-KL Rahul Ruled Out : टीम इंडियाला झटका, जडेजा-केएल राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर; सरफराज खानला संधी | पुढारी

Jadeja-KL Rahul Ruled Out : टीम इंडियाला झटका, जडेजा-केएल राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर; सरफराज खानला संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jadeja-KL Rahul Ruled Out : विशाखापट्टणम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, रवींद्र जडेजा आणि केएल राहुल 2 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. जडेजा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तर केएल राहुल क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नाही. त्यांच्या जागी सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयकडून प्रसिद्धीपत्रक जारी

बीसीसीआयने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात या बदलाची माहिती देण्यात आली आहे. बोर्डाने म्हटलंय की, हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी जडेजाला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, तर केएल राहुलने त्याच्या उजव्या पायच्या क्वाड्रिसेप्सची (गुडघ्याच्या वरील मांडीचे स्नायू) वेदना होत असल्याची तक्रार केली होती. वैद्यकीय पथक या दोन्ही खेळाडूच्या रिकव्हरीवर लक्ष ठेवून आहे, परंतु दुसऱ्या कसोटीपूर्वी ते तंदुरुस्त होणे खूप कठीण आहे, त्यामुळे हे दोन्ही खेळाडू अगामी कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीत. दरम्यान, या दोघांच्या जागी जागी सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

सर्फराज खान इंग्लंड लायन्सविरुद्धच्या तीन अनौपचारिक कसोटी सामन्यांच्या मालिकेचा भाग होता. त्याने नुकत्याच अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात 161 धावांची शानदार खेळी केली. याच सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने दोन विकेट घेत अर्धशतकही झळकावले. दरम्यान, भारत ए संघात वॉशिंग्टन सुंदरच्या जागी सरांश जैनचा समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.

 

 

Back to top button