पालिकेच्या अंदाजपत्रकाचे काम सुरू; पावसाळी कामांच्या निविदांनाही मंजुरी | पुढारी

पालिकेच्या अंदाजपत्रकाचे काम सुरू; पावसाळी कामांच्या निविदांनाही मंजुरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रकाची तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी 20 ते 25 फेब्रुवारीपूर्वी कामाच्या वर्क आर्डर काढण्याच्या सूचना सर्व विभागांना केल्या आहेत. महापालिकेच्या विविध विभागांकडून सुरू असलेली कामे व प्रस्तावित कामे व प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्याचे प्रस्ताव वित्त व लेखा विभागाला सादर केले जातात.

सर्व विभागांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाचे अंदाजपत्रक तयार केले जाते. हे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त दरवर्षी जानेवारीमध्ये स्थायी समितीला सादर करतात. त्यानंतर 31 मार्चपूर्वी स्थायी समिती व मुख्यसभा या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी देतात व 1 एप्रिलपासून नवीन अंदाज पत्रकाची अंमलबजावणी सुरू होते. मात्र, महापालिकेवर प्रशासक नियुक्त असल्याने आयुक्तच स्थायी समिती आणि मुख्यसभेत मान्यता देतात.

लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी मध्ये लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने अंदाजपत्रकाची तयारी सुरू केली आहे. महापालिका आयुक्तांनी सर्व विभागांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, सर्व कामाच्या वर्क ऑर्डर 20 ते 25 फेब्रुवारीपूर्वी काढाव्यात, असेही आदेश दिले आहेत.

पावसाळापूर्व कामांची तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता सुमारे दोन महिने असणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे करण्यासाठी पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे, असे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button