रत्नागिरी : तोतया आयपीएस अधिकाऱ्याला उत्तरप्रदेशमधून केले गजाआड | पुढारी

रत्नागिरी : तोतया आयपीएस अधिकाऱ्याला उत्तरप्रदेशमधून केले गजाआड

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी जिल्ह्यातील एका शासकीय अधिकाऱ्याला त्यांच्या व्हॉटस्अॅपवर मी वरिष्ठ आय.पी.एस. अधिकारी बोलत आहे असा मेसेज पाठवून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या सायबर पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून मुसक्या आवळल्या.

आबिद जाकर (२६, रा. सेशन, तालुका पहाडी डीग, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने एका अधिकाऱ्याला मेसेज करुन मला ३०,००० पाठवा ते मी तुम्हाला २ तासात लगेच परत देतो, असे सांगितले होते.

या मेसेजची त्या शासकीय अधिकाऱ्याला शंका आली तसेच याच दिवशी अनेक शासकीय अधिकारी यांना देखील अशाच प्रकारचे व्हॉटसअॅप मेसेजेस आल्याने त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातावरुद्ध भा. द. वि. कलम ४१९, ४२०, १७० (ब), ५११ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व याचा तपास करण्यात येत होता. या घटनेतील आरोपी महिलेचा व्हॉटसअॅप नंबर हा आरोपी इतरत्र वापरत असल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले.

रत्नागिरी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकरांच्या नेतृत्वाखाली या संशयिताचा स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाद्वारे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदार यांच्याद्वारे सातत्याने पाठपुरवा करण्यात येत होता. अखेर या गुन्ह्यातील आरोपी आबिद जाकर याला तालुका मथुरा राज्य उत्तर प्रदेश येथून या पथकामार्फत ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

आरोपी आबिद जाकर याने हा गुन्हा करण्याकरिता वापरलेला मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला असून सायबर सेलकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, सायबर पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक योगेश खोडे, पोलिस हवालदार शांताराम झोरे, बाळू पालकर, रमिज शेख यांनी केली.

Back to top button