पिंपरी : जलप्रदूषण रोखण्यासाठी अ‍ॅक्शन प्लान | पुढारी

पिंपरी : जलप्रदूषण रोखण्यासाठी अ‍ॅक्शन प्लान

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणार्‍या पवना, इंद्रायणी व मुळा नदींचे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. सांडपाणी व रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने वारंवार नदीपात्र फेसाळणे, मासांच्या मृत्यू होणेे, जलपर्णीने पात्र व्यापणे, दुर्गंधी येणे आदी प्रकार शहरात सातत्याने घडत आहेत. हे जलप्रदूषण कायमचे रोखण्यासाठी महापालिका सर्व नद्यांच्या पाण्याचे नमुने गोळा करून ठिकठिकाणी तपासणार आहे. त्यावरून कोणत्या भागात नदी किती प्रदूषित आहे, हे स्पष्ट होणार आहे.

पवना नदी तसेच, इंद्रायणी नदीचे पाणी शुद्ध करून संपूर्ण शहराला पुरविले जाते. या दोन नद्यांसह मुळा नदी प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेक ठिकाणी थेट नाले नदीत जाऊन मिळतात. एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी नदीत मिसळते. त्यामुळे वारंवार नदीपात्रात फेस निर्माण होत आहे. पवना नदीवर थेरगाव येथील केजुबाई बंधारा आणि इंद्रायणी नदीवर आळंदी येथे फेस तयार होत आहे. अनेकदा मासांचा मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्यात सर्वच नद्या जलपर्णीने भरून जातात. नदीचे पाणीच दिसत नाही. तसेच, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नदीकाठचे रहिवाशी त्रस्त झाले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यासंदर्भात महापालिकेस वारंवार राज्य शासन, पर्यावरण विभाग, तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा बजावल्या आहेत. अनेकदा कानउघाडणीही केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. नाल्याद्वारे थेट नदीत रासायनिक सांडपाणी सोडणार्‍या व्यावसायिक आस्थापना, वर्कशॉप व उद्योगांवर महापालिकेने कारवाई केली जाते. त्याबाबत पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. नदीपात्रात राडारोडा व कचरा टाकण्यावर कारवाई केली जात आहे. हे प्रमाण अल्प आहे. कारवाई करूनही नदीपात्र स्वच्छ होत नसल्याने पर्यावरणप्रेमींनी केंद्र व राज्य शासनाकडे महापालिकेच्या अकार्यक्षमतेबाबत तक्रारी केल्या आहेत. यासंदर्भात ‘पुढारी’ने वारंवार ठळक वृत्त प्रसिद्ध करीत पाठपुरावा केला आहे.

त्यानुसार, महापालिकेने पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील पाण्याचे नमुने पुण्यातील सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिर्व्हसिटीकडून तपासून घेण्यात येणार आहेत. पवना, इंद्रायणी व मुळा नदीत मिळणार्‍या एकूण 84 ठिकाणी पाण्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 11 लाख इतके शुल्क सीओईपीला देण्यात येणार आहे. या ठिकाणी पाण्याची तपासणी केल्यानंतर नदीतील पाण्याची गुणवत्तेत होणारा बदल समजून येणार आहे. त्यानुसार, नदीचे व नदीस मिळणार्‍या नाल्याचे पाण्याची गुणवत्ता तपासून अहवाल सीओईपी महापालिकेस देणार आहे. त्या अहवालावरून महापालिका अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून कारवाई करणार आहे. त्यासाठी मोठा खर्च
अपेक्षित आहे.

पाण्याची गुणवत्ता वाढीसाठी उपाययोजना करणार
नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने ठोस कार्यक्रम हाती घेतला आहे. सीओईपीकडून पाण्याच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार त्या ठिकाणी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जाणार आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी विविध कार्यवाहीत तसेच, प्रदूषण करणार्‍यांवर कारवाई मोहीम तीव्र केली जाणार आहे, असे महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

नदीच्या लांबीनुसार पाण्याची तपासणी
नद्यांच्या लांबीनुसार पाण्याचे नमुने घेण्यात येणार आहेत. पवनानदी 24.40 किलोमीटर अंतर शहरातून जाते. पवनेच्या किवळे ते दापोडी असे एकूण 52 ठिकाणी पाण्याचे नमुने घेण्यात येणार आहेत. इंद्रायणी नदी 18.80 किलोमीटर अंतर शहराच्या एका बाजूने वाहते. या नदीच्या विविध 16 ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले जाणार आहेत. मुळा नदीचे एका बाजूने पात्र शहरातून आहे. वाकड बायपास ते बोपखेल अशी एकूण 14.40 किलोमीटर अंतर ही नदी वाहते. या नदीच्या 16 ठिकाणी पाण्याचे नमुने घेतले जाणार आहे. विविध ठिकाणी पाण्यातील बदल लक्षात घेऊन गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे. दरम्यान, पावसाळा सोडून दर 2 महिन्यांनी तीनही नद्यांतील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे.

Back to top button