स्टोक पार्क : इंग्लंडमधील राजवाड्यावर ‘भारतीया’चे राज्य | पुढारी

स्टोक पार्क : इंग्लंडमधील राजवाड्यावर ‘भारतीया’चे राज्य

लंडन : वृत्तसंस्था

रिलायन्स उद्योग समूहांतर्गत ‘आरआयआयएचएल’ (रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट अँड होल्डिंग) या कंपनीने ब्रिटनमधील 900 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेली ‘स्टोक पार्क’ ही भव्य मालमत्ता 300 एकर परिसरासह 592 कोटी (5.70 कोटी पाऊंड) रुपयांत खरेदी केली आहे. ब्रिटनमध्ये ‘गोल्फ’ हा खेळ कमालीचा लोकप्रिय आहे. ‘गोल्फिंग’सह अन्य क्रीडा प्रकारांच्या व्यावसायिकरणासह ‘हॉटेल’ म्हणूनही या इमारतीचा वापर केला जाईल, असे संकेत आहेत.

अंबानींनी खरेदी केलेली लंडनच्या बकिंघमशायरमधील या ‘स्टोक पार्क’मध्ये कधीकाळी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘जेम्स बाँड’ या हॉलीवूड चित्रपट उद्योगातील पात्राचे वास्तव्य राहिलेले आहे, हे विशेष! माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही ‘स्टोक पार्क’ खरेदीस उत्सुक होते; पण ब्रिटनमधील हा ऐतिहासिक राजवाडा नियतीने एका भारतीयाच्या ललाटी लिहून ठेवलेला होता. कधीकाळी भारतावर राज्य करणार्‍या ब्रिटनमधील या राजवाड्यावर आता अंबानींचे राज्य आहे.

देशातील हॉस्पिटॅलिटी उद्योगाचा जागतिक स्तरावर विस्तार करणे, हे या व्यवहारामागील उद्दिष्ट आहे, असे रिलायन्स उद्योग समूहाने म्हटले आहे. स्टोक पार्कच्या खरेदीनंतर अंबानी परिवार मुंबई सोडून लंडनला राहायला जात आहे, अशा अफवाही उडाल्या.

समूहाने त्याचे खंडन केले आहे. 1908 पर्यंत ही मालमत्ता एका खासगी निवासस्थानाच्या स्वरूपात होती. राणी एलिझाबेथ इथे राहिलेल्या आहेत. सतराव्या शतकातील ब्रिटिश विचारवंत आणि लेखक बिल्यम पॅन यांच्या वास्तव्यानेही ही इमारत पुनित झालेली आहे. 1908 नंतर तिचे रूपांतर गोल्फ कंट्री क्लब व फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाले. एका खोलीचे दिवसाचे भाडे 1 हजार डॉलर होते.

‘जेम्स बाँड’ या चित्रपट मालिकेचे चित्रीकरणही या इमारतीत झालेले आहे. स्टोक पार्क इमारतीत 49 शयनगृहे आहेत. हॉटेल, क्रीडाविषयक सुविधा, युरोपातील सर्वाधिक महागडा गोल्फ कोर्स या मालमत्तेचे भाग आहेत.

इमारतीतील पिलर्स तसेच फ्लोअरिंग संगमरवरी आहेत. स्टोक पार्कच्या माध्यमातून निवडक सेवांवर अंबानींचा भर असणार आहे. आयपीएलमध्ये ते आहेतच.

गोव्यात फूटबॉलपटू घडविण्यातही ते हिरीरीने पुढे असतात. खेळाशी त्यांचे जुने नाते आहे. ब्रिटनमध्ये गोल्फ या खेळाची मोहिनी मोठी आहे. यातूनच ही खरेदी अंबानींनी केली आहे.

‘स्टोक पार्क’चा व्यावसायिक वापर ते अनेक पद्धतीने करणार आहेत. स्टोक पार्क हॉटेल, गोल्फ कोर्स, टेनिस कोर्ट, इनडोअर स्विमिंग पूल असे सगळे ते असेल. इमारतीचे नूतनीकरण अंबानी यांनी आपल्या हिशेबाने सुरू केले आहे. लंडनमधील हिथ्रो विमानतळापासून हे ठिकाण फक्त 7 मैल अंतरावर आहे.

हॉलीवूडला शूटिंगसाठी देणार

‘स्टोक पार्क’ हॉटेलमध्ये आधीही हॉलीवूड चित्रपट, तसेच वेबसीरिजची चित्रीकरणे होत आली आहेत. पुढेही असा वापर या इमारतीचा होऊ शकतो. भव्य ‘अ‍ॅवॉर्ड फंक्शन्स’साठीही भाडेतत्त्वावर ही जागा दिली जाऊ शकते.

अनेक भारतीय गर्भश्रीमंत लंडनचा वापर आपला व्यावसायिक तळ म्हणून करत आलेले आहेत. ‘पोलाद किंग’ लक्ष्मी मित्तल, वेदांता समूहाचे मालक अनिल अग्रवाल ही काही उदाहरणे आहेत. अंबानी हे नवे नाव आता या यादीत जोडले गेले आहे.

या चित्रपटांचे शूटिंग

श्र1964 मधील जेम्स बाँडच्या ‘गोल्ड फिंगर’चे
श्र1997 मध्ये ‘टुमारो नेव्हर डाईज’चे
श्र2001 मधील ‘ब्रिजेट जोन्स डायरी’चे
श्र ‘नेटफ्लिक्स’च्या ‘द क्राऊन’ या वेब सीरिजचे

‘स्टोक पार्क’ची पार्श्वभूमी

कॅपेबिलिटी ब्राऊन आणि हम्फ्री रेप्टन यांनी या इमारतीचे डिझाईन केले होते. 1790 ते 1813 दरम्यान तत्कालीन राजे जॉर्ज तृतीय यांचे वास्तुविशारद जेम्स वॉट यांनी खासगी निवासस्थानाच्या रूपात तयार केले.

सध्या या मालमत्तेची मालकी ब्रिटनमधील ‘किंग’ कुटुंबाकडे होती. हर्टफोर्ड, विटनी, चेस्टर या किंग भावंडांकडून अंबानींनी ती विकत घेतली. किंग बंधू गेली अनेक वर्षे ही मालमत्ता विकण्याच्या प्रयत्नात होते.

डोनाल्ड ट्रम्प यांचाही होता डोळा!

2016 मध्ये ब्रिटनमधील ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने ‘स्टोक पार्क’वर अमेरिकन उद्योगपती, तसेच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा डोळा असल्याची बातमी दिली होती; मात्र काही कारणांनी व्यवहार होऊ शकला नाही.

रिलायन्सचा ‘हॉस्पिटॅलिटी’कडे कल

रिलायन्स समूहाचा अलीकडच्या काळात ‘हॉस्पिटॅलिटी’ व्यवसायाकडे कल वाढलेला आहे. मुंबईतील सर्वाधिक महागड्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये या समूहाने ‘स्टेट कन्व्हेंशन सेंटर’ आणि ‘रूफटॉप थिएटर’ सुरू केले आहे. ‘जियो गार्डन’ नावाने ते चालविले जाते.

मुंबईमधील नरीमन पॉईंटवरील ओबेरॉय हॉटेलही समूहाने खरेदी केले आहे. अंबानी यांच्या हॉस्पिटॅलिटी व्यवसायाची जबाबदारी रिलायन्सच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट अँड होल्डिंग’कडे आहे.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात काय काय?

लॉजिंग, फूड अँड ड्रिंक सर्व्हिस, इव्हेंट प्लॅनिंग, थीम पार्क, ट्रॅव्हल आणि टुरिझम, हॉटेल, रेस्टॉरंट, बार.

राणी एलिझाबेथ यांच्या कार्यकाळात ही मालमत्ता ब्रिटिश राजघराण्याच्या ताब्यात होती. तत्पूर्वी, 1603 ते 1664 दरम्यान ब्रिटनचे पहिले मुख्य न्यायमूर्ती सर एडवर्ड यांची मालकीही या प्रासादावर राहिलेली आहे.

Back to top button