सिंहायन आत्मचरित्र : साहित्य चळवळीला उभारी | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : साहित्य चळवळीला उभारी

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

गतवर्षी पाच नोव्हेंबर, 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

‘पुढारी’चा रौप्यमहोत्सव साजरा झाला ते साल होतं 1963 आणि आता 1989 मध्ये सुवर्णमहोत्सवही धुमधडाक्यात साजरा होणार होता. रौप्यमहोत्सवावेळी मी विद्यार्थीदशेतच होतो. त्यामुळे समारंभाची बहुतांशी जबाबदारी आबांच्या खांद्यावरच होती. परंतु, यावेळी सुवर्णमहोत्सवाची सर्व जबाबदारी मला एकट्यालाच पेलायची होती आणि तो धुमधडाक्यात साजरा व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील होतो.

मात्र या आनंदी सोहळ्याला एकच दुःखाची किनार होती की, हा उत्सव पाहायला आबा या जगात नव्हते! ते नुकतेच आम्हाला सोडून गेले होते. रौप्यमहोत्सवाला आबा होते; पण सुवर्णमहोत्सवाला नाहीत, याची खंत मनाला लागून राहिली होती. सुवर्णमहोत्सवी वर्ष तोंडावर असतानाच त्यांचं जाणं जीवाला वेदना देऊन गेलं होतं. मी ‘पुढारी’चा प्रचंड विस्तार केला असला, तरी हे रोपटं आबांनी लावलेलं. सुवर्णमहोत्सव म्हणजे त्या वृक्षावरचं एक गोड फळ. ते पाहायला आबा नाहीत, ही बाब मात्र प्रचंड अस्वस्थ करणारी होती.

आबांची उणीव क्षणोक्षणी भासत होती. परंतु, त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत, हे गृहीत धरूनच मी कामाला लागलो होतो..!सुवर्णमहोत्सवानिमित्त निरनिराळे उपक्रम पार पाडले जात असतानाच दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. साहित्य आणि ‘पुढारी’ यांचा पहिल्यापासूनच अन्योन्य संबंध. त्यामुळे साहजिकच द. म. साहित्य सभेला कोल्हापुरात साहित्य संमेलन घेण्याची इच्छा झाली.

आषाढी आणि कार्तिकीची यात्रा दरवर्षी पंढरपुरात रंगतच असते. परंतु, तिला खरी शोभा येते, ती वारकर्‍यांच्या सहभागानेच! भक्तांच्या मांदियाळीविना प्रत्यक्ष पांडुरंगही एकटा पडतो. तद्वतच, ‘पुढारी’च्या सुवर्णमहोत्सवालाही सारस्वतांच्या मांदियाळीविना कशी काय शोभा येणार होती?

त्यातून ‘पुढारी’ हे सारस्वतांचं माहेरच! ‘पुढारी’नं अनेक अगणित साहित्यिक घडवले. एका अर्थानं त्यांचं माहेरपणच केलं. त्यांचं पहिलंवहिलं साहित्य ‘पुढारी’तून छापून, त्यांची ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ म्हणून पाठवणी केली. परंतु, लेक सासरी गेली, सासरात रमली, संसारात गढून गेली, तरी तिला माहेरची आठवण आल्याशिवाय राहात नाही. याबाबतीत कृ. ब. निकुंबांची कविता खूपच बोलकी आहे.

‘घाल घाल पिंगा वार्‍या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग, आईच्या कानात
आई-भाऊसाठी परी, मन खंतावत’

या कवितेप्रमाणेच सर्व साहित्यिकांना ‘पुढारी’च्या सुवर्णमहोत्सवात सहभागी होण्याची इच्छा झाली नसेल, तरच नवल!
आणि म्हणूनच ‘पुढारी’च्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्तानं कोल्हापुरात ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन’ भरवण्याचा निर्णय घेतला. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेनं या त्यांच्या निर्णयाला संमती देताना माझ्या मनात भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सांगितलेला एक महत्त्वाचा विचार घर करून होता. ते म्हणाले होते,

‘जिस देश को अपनी भाषा और अपने साहित्य के गौरव का अनुभव नहीं हैं, वह उन्नत नहीं हो सकता।’

या निमित्तानं कोल्हापुरात सारस्वतांची मांदियाळी जमवायचीच, असा निर्धार दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेनं केला आणि मग सर्वजण कामाला लागले. प्रामुख्यानं द. मा. साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा. देवदत्त पाटील तसेच कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकुमार नलगे आणि प्रा. भैरव कुंभार यांनी या कामी पुढाकार घेतला होता.

4 फेब्रुवारी 1989 रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात संमेलन घेण्याचं निश्चित झालं. संमेलनस्थळाला ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव साहित्यनगर’ असं नाव देण्यात आलं. ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन’ असं व्यासपीठ असलं, तरी ते झालं मात्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तोडीचं! कारण, मराठीतील बहुतेक सारेच नामवंत साहित्यिक मग ते लेखक, कवी किंवा नाटककार असोत, झाडून सारेच या संमेलनात सहभागी झाले होते.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारखे प्रकांडपंडित, थोर विचारवंत अध्यक्ष म्हणून लाभले होते आणि संमेलनाचं हेच तर प्रमुख आकर्षण होतं, तर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात उद्घाटक म्हणून लाभले होते. तसेच नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते संमेलनाचा विशेषांक आणि अन्य पुस्तकांचं प्रकाशन होणार होतं. मी अर्थातच स्वागताध्यक्षाच्या भूमिकेत होतो.

थोडासा अतिशयोक्तीचा दोष पत्करून सांगायचं झालं, तर हे संमेलन म्हणजे एक मल्टिस्टारकास्ट चित्रपटच होता आणि म्हणूनच साहित्यप्रेमी करवीरवासीयांना त्याचं फार फार आकर्षण होतं. ‘पुढारी’चा कोणताही उपक्रम हा तोलामोलाचाच झाला पाहिजे, असा आमचा नेहमीचाच दृष्टिकोन. त्याच दृष्टिकोनातून या साहित्य संमेलनाची सुसज्ज तयारी करण्यात आली होती.

4 फेब्रुवारीला संमेलन होतं. त्याच्या आदल्याच दिवशी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर कवी, नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी ‘पुढारी’ला भेट दिली. मी त्यांचं पुष्पहार घालून हार्दिक स्वागत केलं. तात्यासाहेबांनीही ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव तथा आबा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या मनातील आबांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली.
माझ्याशी मनमोकळ्या गप्पागोष्टी करताना तात्यासाहेबांनी आम्हाला एक गुपित सांगितलं.

“पंचेचाळीस वर्षांपूर्वी मी मुंबईत ‘पुढारी’चा प्रतिनिधी होतो. त्यावेळी दुसरं महायुद्ध जोरात चालू होतं. मी ‘पुढारी’ला महायुद्धाच्या बातम्या तारेनं पाठवीत असे. तेव्हा मला ‘पुढारी’कडून महिना वीस रुपये मानधन मिळत होतं. ‘पुढारी’कार देत असलेलं मानधन त्या काळात आम्हाला खूप मोठं वाटायचं!”

ही माहिती ऐकून मीही अचंबित झालो. कारण, माझ्यासाठीही ही माहिती नवीन होती. पन्नास वर्षांच्या वाटचालीत ‘पुढारी’च्या या दिंडीत कोण कोण सामील झालं होतं आणि या पालखीला किती मान्यवरांचा खांदा लाभला होता, ते एक ‘पुढारी’ आणि दुसरे स्वतः आबाच जाणोत!

“आबांचे नि माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. मी त्यांना अनेकदा भेटलोय,” असंही तात्यासाहेबांनी आवर्जून सांगितलं.
कुसुमाग्रजांनी ‘पुढारी’चा विस्तार आणि प्रभाव याचं मनापासून कौतुक केलं. दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाला पाठविलेल्या शुभसंदेशातही त्यांनी हा उल्लेख केलेला आहे.

‘सामाजिक प्रबोधनाचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून निर्धाराने वृत्तपत्र व्यवसाय सुरू केलेल्या ‘पुढारी’कार ग. गो. जाधव यांचे नाव कोल्हापूरच्या आधुनिक इतिहासात गौरवाने लिहिले जाईल.’

असंही त्यांनी आपल्या शुभसंदेशात नमूद केलेलं होतं. आबांविषयी त्यांच्या मनात असणारा आदरभावच त्यातून प्रकट होत होता.
4 फेब्रुवारी 1989 चा दिवस उजाडला. सकाळी नऊ वाजता संमेलनाचं उद्घाटन होणार होतं. मात्र, त्या आधीच रसिक प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. मान्यवर साहित्यिकही वेळेआधीच दाखल झाले होते. उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत होता. त्या उत्साहभरीत वातावरणातच संमेलनाचं उद्घाटन टाळ्यांच्या कडकडाटातच संपन्न झालं. मी स्वागताध्यक्ष या नात्यानं सर्वच मान्यवरांचं पुष्पहार घालून स्वागत केलं.

स्वागताध्यक्ष या नात्यानं प्रारंभी मी स्वागतपर भाषण केलं. मी माझे विचार मांडताना म्हणालो, “साहित्यात सामाजिक बांधिलकी असणं आवश्यक आहे. कलेसाठी कला की जीवनासाठी कला, असा वाद एकेकाळी रंगला होता. त्यावेळी थोर साहित्यिक भाऊसाहेब खांडेकर यांनी, ‘कला ही जीवनासाठीच असली पाहिजे,’ असं ठणकावून सांगितलं होतं. या ठिकाणी उपस्थित साहित्यिकांमध्ये कदाचित वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात; पण व्यक्तिशः मी भाऊसाहेबांच्या विचारांची पाठराखण करतो.”

माझ्या भाषणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटानं दाद दिली आणि इथूनच संमेलनानं सूर पकडला.

माझ्यानंतर उद्घाटक शंकरराव खरात उद्घाटनपर भाषण करायला उभे राहिले. ते म्हणाले, “महाराष्ट्राला कोल्हापूरनंच पुरोगामी विचार दिलेला आहे. त्या विचाराचं बीज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी या मातीत पेरलं. म्हणूनच कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचं तीर्थस्थळ आहे, असं म्हटलं तरी ते वावगं होणार नाही!”

“पुढारी’नं राजर्षींच्या पुरोगामी विचारांचा हा वारसा पुढं नेलेला आहे,’ असं सांगून आबांशी त्यांच्या असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांची माहितीही त्यांनी दिली. “ग. गो. जाधव यांच्याशी माझे निकटचे संबंध होते,” असेही खरात म्हणाले.

तर्कतीर्थांची वाग्देवता तर आज संमेलनावर मनापासून प्रसन्न झाली होती. त्यांचं अध्यक्षीय भाषण म्हणजे पंचपक्वानांची मेजवानीच! त्यांनी ‘पुढारी’चा गौरव तर केलाच; पण त्याची तुलना राजकीय पुढार्‍यांशी करताना ते व्यंगोक्तीनं म्हणाले, “गेली 50 वर्षे मी ‘पुढारी’ वाचतो आहे. अनेक पुढारी आले आणि गेले. दैनिक ‘पुढारी’ मात्र कायम आहे!”
त्यांच्या या विधानावर झालेला टाळ्यांचा कडकडाट थांबण्यासाठी त्यांनाच वाट पाहावी लागली.
“कलामूल्ये अबाधित ठेवून संघर्ष प्रकट करतं, ते खरं साहित्य. तसेच दुःखाचं नि संघर्षाचं दर्शन घडवतं, ते खरं साहित्य.”
तर्कतीर्थांनी साहित्याची सांगितलेली ही परिभाषा रसिक मनाला भावली.

‘मी लिहिता झालो’ हा परिसंवाद संमेलनाचं प्रमुख आकर्षण ठरला. ‘जे सुचतं, स्फुरतं ते व्यक्त करणं, यातूनच साहित्यिक घडतो,’ असं सांगत रणजित देसाई यांनी आपली जडणघडण स्पष्ट केली.

तसेच शंकरराव खरात, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, डॉ. आनंद यादव, ह. मो. मराठे, प्रल्हाद वडेर यांसारख्या मान्यवर साहित्यिकांनी परिसंवादात आपले मौलिक विचार मांडून रंग भरला.

प्रख्यात विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांची संमेलनावरची प्रतिक्रिया तर फारच बोलकी होती. ते म्हणाले,
“संमेलन नेटकेपणानं पार पडलं. संयोजन उत्तम होतं. विभागीय साहित्य संमेलनाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर साहित्यिक उपस्थित राहण्याची ही पहिलीच घटना. यावर्षी अमरावतीला झालेल्या अ. भा. साहित्य संमेलनालाही यापेक्षा कमी साहित्यिक होते. ‘पुढारी’च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त झालेल्या या संमेलनाचं नियोजन आणि संयोजनही उत्तम होतं, याची प्रचिती आली.”

एका ज्येष्ठ लेखकाची ही प्रतिक्रिया म्हणजे संमेलनाच्या यशस्वितेची पावतीच म्हटली पाहिजे. हे संमेलन म्हणजे सारस्वतांचा आनंदमेळावाच होता. जणू दिंड्यापताका घेऊन सर्व शारदापुत्र साहित्याच्या पंढरीत, बेहोशीनं नाचत आणि गात आहेत,

‘खेळ मांडियेला वाळवंटी घाई,
नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान गेला पावटणी,
एका एका लागती पायी रे’

‘पुढारी’च्या सुवर्णमहोत्सवाचं औचित्य साधून कोल्हापुरात साहित्य संमेलन जरी संपन्न झालं असलं, तरी माझा साहित्यिकांबरोबरचा सहवास आणि साहित्यिकांशी मैत्र पहिल्यापासूनच आहे. म्हणूनच अनेक नवोदित साहित्यिकांचं पहिलं साहित्य आम्ही ‘पुढारी’मधून प्रसिद्ध करीत आलेलो आहोत आणि तेच साहित्यिक पुढे नावारूपासही आलेले आहेत.

आपलं पहिलं अपत्य जन्मल्यानंतर त्याचा चेहरा पाहणं ही प्रत्येक माणसासाठी आनंदाची पर्वणीच असते. लेखकांच्या बाबतीतही असंच काहीसं असतं, असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. आपलं कोणत्याही प्रकारचं लिखाण, जेव्हा प्रथम प्रकाशित होतं, तेव्हा त्यांना होणारा आनंद शब्दांत काय वर्णावा! अशा अनेक नवोदित लेखकांना सर्वप्रथम व्यासपीठ मिळवून देऊन ‘पुढारी’ही त्यांच्या आनंदात सामील झाला आहे.

‘स्वामी’कार रणजित देसाई यांची पहिली कथा ‘पुढारी’नंच प्रसिद्ध केली. तसेच मधु मंगेश कर्णिक यांच्यासह अनेकांच्या पहिल्या कथांना ‘पुढारी’तच स्थान मिळालं. साहित्याशी ‘पुढारी’ची अशी नाळ जुळलेली आहे.

पन्हाळा येथे राज्य साहित्य संस्कृती मंडळानं 1986 च्या डिसेंबरमध्ये नवलेखकांचं शिबिर भरवलं होतं. साहित्याशी असलेल्या नात्यातून या शिबिराला भेट देऊन, मार्गदर्शक म्हणून मी विचार मांडले होते. त्यावेळी आवाहन करताना मी म्हणालो होतो,

“ग्रामीण भागातील लोकसाहित्य हा महाराष्ट्राचा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. परंतु, दुर्लक्षिला गेल्यामुळे तो नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासन आणि साहित्य-संस्कृती मंडळानं तो जतन करण्याची जबाबदारी पार पाडावी.”

पंचेचाळीस नवलेखक या शिबिराला उपस्थित होते. त्यांच्याशी मी मनमोकळा संवाद साधला होता. सुरुवातीपासूनच माझे साहित्याशी ऋणानुबंध जुळलेले. वयाच्या तिसर्‍या वर्षी मी आचार्य अत्रे यांना भेटलो. त्यांच्याबरोबर फोटोही काढला होता. पुढे माझ्या तरुणपणात अत्रे यांचं वरळीचं ‘शिवशक्ती’ हे निवासस्थान माझं हक्काचं ठिकाण झालं होतं. राजाराम महाविद्यालयात शिकत असताना तर एका कार्यक्रमाला आम्ही आचार्य अत्र्यांना बोलावलं होतं.

रणजित देसाई, शिवाजी सावंत, आनंद यादव, शंकर पाटील हे साहित्यिक तर ‘पुढारी’च्या ‘बहार’ पुरवणीचं कामही पाहायचे. त्याचबरोबर शंकर सारडा, विश्वास पाटील, कुसुमाग्रज, शांता शेळके, रमेश मंत्री, यु. म. पठाण, शंकर खंडू पाटील यांसारख्या अनेक साहित्यिकांशी माझं मैत्र जुळलं. यापैकी अनेक जण ‘पुढारी’साठी लिहायचेही. शिवाजी सावंत आणि रणजित देसाई यांच्याशी गप्पाटप्पा म्हणजे एक चमचमीत मेजवानीच असायची. हे दोघे आपल्या एखाद्या नवीन कादंबरीच्या प्रकरणात असे काही घुसायचे की, ती मैफल संपूच नये, असं वाटत राहायचं.

बातम्यांबरोबरच समाजाचं संपूर्ण प्रतिबिंब वृत्तपत्रात उमटलं पाहिजे, ही माझी धारणा. मग त्यापासून साहित्य तरी कसं अलिप्त राहू शकेल? शेवटी साहित्य हा समाजाचा एक आरसाच असतो ना? त्यात समाजाचंच प्रतिबिंब उमटलेलं असतं. आम्ही वर्तमानपत्रात बातम्या छापल्या तरी एखाद्या घटनेचं लालित्य हे साहित्यातच पाहायला मिळतं. साहजिकच असं उत्तमोत्तम साहित्य वाचकांसमोर नेहमीच आलं पाहिजे, अशी ‘पुढारी’ची धारणा नेहमीच राहिली आहे आणि त्यादृष्टीनं ‘पुढारी’ नेहमीच कार्यरत राहिला आहे.

साहित्यरत्न वि. वा. शिरवाडकर यांच्यासारखे दिग्गज साहित्यिकही स्वतःहून ‘पुढारी’चा गुणगौरव करतात. त्यातच सारं काही आलं. त्यामुळेच मी आजपर्यंत अशा साहित्यिक उपक्रमांतून भाग घेत आलो आहे आणि यापुढेही घेत राहीन.

‘समाज और राष्ट्र की भावनाओं को परिमार्जित करनेवाला साहित्य ही सच्चा साहित्य है।’

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक जनार्दन प्रसाद झा ‘द्विज’, यांच्या या विचारांपासून ‘पुढारी’ तरी कसा दूर राहू शकेल! आणि म्हणूनच सुवर्णमहोत्सवाच्या निमित्तानं संपन्न झालेल्या साहित्य संमेलनाला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनानं एका अर्थी ‘पुढारी’च्या सुवर्णमहोत्सवाचं तोरणच बांधलं. तिथूनच खर्‍या अर्थानं सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ झाला. सारस्वतांच्या त्या मांदियाळीनं जणू ज्ञानेश्वरांचं पसायदानच आळवलं होतं.

‘आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावें
तोषोनी मज द्यावे
पसायदान हे॥’

Back to top button