राज्यात 35 लाख टन साखर उत्पादन | पुढारी

राज्यात 35 लाख टन साखर उत्पादन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ऊसगाळप हंगामाने जोर पकडला असून, सद्य:स्थितीत 35 लाख टन साखरेचे उत्पादन तयार झाले आहे.  साखर कारखान्यांनी 402 लाख टन ऊसगाळप पूर्ण केले असून, सरासरी साखर उतारा 8.84 टक्क्यांइतका हाती आला आहे. राज्यात सद्य:स्थितीत 9 लाख 8 हजार 600 टन याप्रमाणे उसाचे रोजचे गाळप होत असल्याची माहिती साखर आयुक्तालयातून देण्यात आली.
राज्यात 96 सहकारी आणि 99 खासगी मिळून 195 साखर कारखान्यांकडून ऊसगाळप सुरू आहे. गतवर्षीच्या ऊसगाळप हंगामात 28 डिसेंबरअखेर 102 सहकारी आणि 99 खासगी मिळून 201 साखर कारखान्यांनी 478 लाख टन ऊसगाळप पूर्ण केले आहे, तर 9.32 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 44 लाख 65 हजार टनाइतके साखर उत्पादन तयार केले होते. याचा विचार करता अद्यापही 76 लाख टनांनी ऊसगाळप कमीच झाले आहे. ऊस गाळपात पुणे विभागाची (पुणे व सातारा जिल्हा) आघाडी कायम आहे.
येथील 29 कारखान्यांनी 92 लाख टन ऊसगाळप पूर्ण केले असून, 9.09 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 83.68 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. दरम्यान, सोलापूर विभागात 87.06 लाख टन ऊसगाळप, तर 8.12 टक्के उतार्‍यानुसार 70.71 लाख क्विंटलइतके साखर उत्पादन हाती आले आहे. विभागनिहाय ऊसगाळप पाहता अहमदनगरमध्ये 51.66 लाख टन, औरंगाबाद 38.02, नांदेड 45.59, अमरावती 3.48, नागपूरमध्ये 0.83 लाख टनाइतके ऊसगाळप पूर्ण केले.
“राज्यात अद्याप 518 लाख टन उसाचे गाळप पूर्ण होणे बाकी आहे. सद्यस्थितीत 9 लाख टन प्रतिदिन यानुसार सुरू असलेले ऊसगाळप पाहता फेब्रुवारी महिनाअखेर ऊसगाळप सुरू राहील. शेतकरी संघटनेच्या ऊस दराच्या आंदोलनामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ऊसतोडणी ही यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीस अत्यंत संथ गतीने सुरू राहिली. त्यामुळे हंगाम पंधरा दिवसांनी वाढून फेब्रुवारीअखेर सुरू राहील.
– सचिन बर्‍हाटे, साहाय्यक संचालक  (विकास),  साखर आयुक्तालय.

साखर उत्पादन, उतार्‍यात कोल्हापूरचा डंका

 राज्यात कोल्हापूर विभागातील ऊसगाळप पुणे विभागापेक्षा तुलनेने कमी आहे. या विभागात 84.11 लाख टन ऊसगाळप पूर्ण झाले आहे. मात्र, साखर उत्पादन आणि उतार्‍यातील कोल्हापूर विभागाचा डंका कायम आहे. या विभागाचा साखर उतारा 10.09 टक्क्यांइतका सर्वाधिक असून, सुमारे 84.88 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार झाले आहे.
हेही वाचा

Back to top button