नराधम भाऊ ! मावस बहिणीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ केला व्हायरल | पुढारी

नराधम भाऊ ! मावस बहिणीचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ केला व्हायरल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती जवळच्या एका गावात बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. शिक्षणासाठी मावशीकडे राहणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचे तिच्या मावसभावानेच कपडे बदलतानाचे व्हिडीओ काढले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने ते व्हायरल करत संबंधित मुलीला ब्लॅकमेल केले. अडचणीत सापडलेल्या या मुलीसाठी तिच्या मैत्रिणी आणि सामाजिक कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी या प्रकरणाचा भांडाफोड केला. अखेर तिच्या मावसभावावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ही पीडिता शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. ती शिक्षणासाठीच बारामतीजवळच्या गावात राहणाऱ्या तिच्या मावशीकडे आली होती. ती घरामध्ये कपडे बदलत असताना आणि अंघोळ करत असताना तिचे व्हिडीओ त्याने काढले. त्या आधारे त्याने अनोळखी क्रमांकावरून तिच्याशी संपर्क साधत तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. या मुलीने मैत्रिणींना ही बाब सांगितली. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे यांची मदत घेतली. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना सर्व हकीकत सांगण्यात मदत मागण्यात आली.

मुलीला मेसेज येत असलेल्या मोबाइलचे डिटेल्स काढण्याचा प्रयत्न सुरवातीला झाला. परंतु त्याने मोबाईल स्विच ऑफ ठेवला. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅप लावण्याचे नियोजन केले. ते देखील जमले नाही. अखेर या मुलीने धाडसाने त्याच्याशी चॅटींग सुरु ठेवले. त्याने तिच्याकडे एकदा भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार पुढील प्लॅन पोलिसांच्या मदतीने आखण्यात आला. शहरातील एका विद्यालयाजवळ भेट ठरली. परंतु त्याने ती तेथे आल्यानंतर पुढे पाटस रस्त्यावर भेटायला ये असे सांगितले. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे अक्षय सिताप, दशरथ इंगुले आदींनी सापळा रचत त्याला पकडले. त्याच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला. अखेर तो हाती आल्यावर तो या पीडितेचा मावसभाऊच असल्याचे समोर आले. दरम्यान या मुलीच्या कुटुंबाची स्थिती गरीबीची आहे. त्याचा फायदा घेत तिने त्याच्या विरोधात तक्रार दाखल करू नये, यासाठी दबावाला सुरुवात झाली. परंतु पोलिसांनी स्वतःहून पुढे येत फिर्याद दाखल करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

धाडस व सतर्कता ठरली महत्त्वाची

या घटनेत संबंधित मुलीच्या मैत्रिणींनी तिला दिलेली साथ, तिने स्वतःहून केलेले धाडस आणि पोलिसांनी दाखवलेली सतर्कता महत्त्वाची ठरली. आपली मैत्रिण अडचणीत असल्याचे पाहताच तिच्या मैत्रिणी या आई-वडिलांशी खोटे बोलून दोन दिवस बाहेर राहिल्या. वडापाव खावून त्यांनी दोन दिवस काढले. परंतु आरोपींपर्यंत पोहोचल्याशिवाय त्या मागे हटल्या नाहीत. या मुलींचा उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सत्कार केला.

हेही वाचा :

Back to top button