Girish Mahajan : मंत्री महाजनांची घोड्यावरून रपेट, सारंगखेडा यात्रेत घोडेस्वारीचा माेह अनावर | पुढारी

Girish Mahajan : मंत्री महाजनांची घोड्यावरून रपेट, सारंगखेडा यात्रेत घोडेस्वारीचा माेह अनावर

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवाएकमुखी श्री गुरुदत्त आणि घोडेबाजार यासाठी प्रसिद्ध असलेल्या तापी काठावरील सारंगखेडा यात्रेला बुधवारी (दि.२७) राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. उमदेपणाची भाषणातून अथवा कृतीतून छाप सोडण्यासाठी प्रसिद्ध असलेले महाजन यांना घोडेबाजार पाहत असताना घोड्यावर बसून रपेट मारण्याचा मोह झाला नसता तरच नवल. स्पर्धेसाठी आलेल्या घोड्यांची पाहणी करताना त्यांनी घोड्यावर काही मिनिट रपेट मारली, तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

यावेळी आमदार जयकुमार रावल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा चेतक फेस्टिव्हलचे मुख्य प्रवर्तक जयपाल रावल, जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, दोंडाईचाच्या माजी नगराध्यक्षा नयनकुंवर रावल आदी उपस्थित होते.

हजारो यात्रा आणि त्यानिमित्ताने होणारे महोत्सव देशभर होत असतात, परंतु सारंगखेड्याची यात्रा अन् चेतक महोत्सव हा देशातला आगळावेगळा स्वरूपाचा आनंद सोहळा असल्याचे प्रतिपादन महाजन यांनी यावेळी केले.

सारंगखेड्याच्या यात्रेला मोठा ऐतिहासिक आणि प्राचीन वारसा लाभला असून, केवळ अश्व महोत्सवच नाही तर या यात्रेच्या निमित्ताने होणारा पशुंचा बाजार आणि सुकामेव्याचा बाजारही वैशिष्ट्यपूर्ण असतो. जुन्या काळात अफगाणिस्थानातूनही येथे अश्व, सुकामेवा विक्री आणि प्रदर्शनासाठी येत असे. चेतक फेस्टिव्हलच्या रूपाने तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेला ग्लोबल करण्यासाठी विशेष सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. ही यात्रा येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी मंत्री, आमदार रावल यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

हेही वाचा :

Back to top button