Nagar: पोलिस मित्रांची वारी..ठाण्याच्या दारी! | पुढारी

Nagar: पोलिस मित्रांची वारी..ठाण्याच्या दारी!

बाळासाहेब गदादे

चिचोंडी पाटील : सध्या नगर शहरासह अनेक बायपास रस्त्यांवर पोलिस मित्र दिसून येतात. पोलिसांसारखा वेश परिधान करून हे पोलिस मित्र वाहन चालकांकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न करत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणातून नगर तालुक्यातील अरणगाव येथे एका पोलिस मित्राला ग्रामस्थांनी चोपले होते. अशाच प्रकारामुळे नगर तालुक्यातील वाळुंज बायपास येथून मागील महिन्यात दोन पोलिस मित्रांना पोलिसांनी अटक केली होती.

मात्र, या पोलीस मित्रांना समज देऊन नंतर सोडण्यात आले होते. नगर तालुक्यात या पोलिस मित्रांची चांगलीच चर्चा झाली होती. जनावरे घेऊन जाणार्‍या टेम्पो चालकाकडून या पोलिस मित्रांना पैसे उकळण्याचा प्रकार चक्क एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या समोरच घडला होता. त्याचा व्हिडिओ पोलिस निरीक्षकाकडे असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर या दोन पोलिस मित्रांना संबंधित पोलिस ठाण्यात दिवसभर बसून ठेवण्यात आले होते. मात्र, काही लोकांच्या मध्यस्थीमुळे हे प्रकरण मिटले होते. यातील एक पोलिस मित्र एका संघटनेचा सदस्य व संपर्कात होता. त्याचे मोबाईल पोलिसांनी तपासल्यानंतर त्याला जनावरे वाहून नेणार्‍या टेम्पोचे लोकेशन मिळत होते.

मात्र, ही जनावरे वाहून नेणारा टेम्पो कुठल्याही कत्तलीसाठी किंवा जनावरांना इजा होईल, अशा प्रकारे नेण्यात येत नव्हता. तो टेम्पो एका शेतकर्‍याचा आहे, असे सांगूनही त्याच्याकडून पैसे उकळण्याचा अट्टहास या पोलिस मित्राने केला होता. या प्रकारांनतर त्या पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी गुन्हा दाखल करणे बंधनकारक असतानाही, पोलिस मित्रांना फक्त समज देऊन सोडण्यात आले. हा प्रकार जरी ठाण्यात येऊन मिटला असला तरी, त्याची जोरदार चर्चा रंगली होती.

असाच काहीसा प्रकार मागील पंधरवड्यात पुन्हा तालुक्यातील दुसर्‍या पोलिस ठाण्यात पाहायला मिळाला. पोलिस मित्र वाहन चालकाकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, तेथील सहाय्यक पोलिस निरीक्षकाने त्यांना अटक केली. मात्र, यातही मध्यस्थी होऊन त्या पोलिस मित्रांना सोडण्यात आले. पोलिस मित्रांकडून वारंवार कायद्यांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर नगर शहरातही पोलिस कर्मचार्‍यांसोबत हे पोलिस मित्र कर्तव्य बजावताना दिसतात. मात्र, त्यांना पोलिसांसारखा दिसणारा गणवेश घालण्याची परवानगी आहे का, असेल तर यावर कुठली बंधने आहेत का, याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेंडी बायपास येथे पाच-सहा महिन्यांपूर्वी पोलिस मित्र वाहन चालकांकडून पैसे उकळत असल्याचा प्रकार एका व्यक्तीने कॅमेर्‍यात कैद केला होता. त्यानंतर या व्हिडिओची जोरदार चर्चा झाली. यानंतर पोलिस अधीक्षकांनी याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याची चर्चा होती. मात्र, असा कुठलाही आदेश वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देण्यात आला नव्हता. पोलिसांसारखा दिसणारा गणवेश घालून हे पोलिस मित्र दिवसाढवळ्या वाहनचालकांची लूट करताना जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पोलिस मित्रांचा गणवेश बदलण्यात यावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांमधून होत आहे.

गणवेशावर ट्रॅक सूटची कमाल

पोलिसांसारखा वेश परिधान करून त्यावर ट्रॅकसूट घातला की, ही व्यक्ती खरा पोलिस आहे की पोलिस मित्र, याबाबत अनेकदा संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे नागरिक, वाहनचालक घाबरतात. यातूनच पोलिस मित्रांकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत.

पोलिस मित्रांना मानधन देतं कोण?

अनेकदा हे पोलिस मित्र पोलिस कर्मचार्‍यांसोबत आढळून येतात. ते या पोलिस कर्मचार्‍यांना कामात मदतही करतात. मात्र, त्यांना मानधन कोणाकडून व कशा स्वरूपात दिले जाते, ते देण्यासाठी कायद्यात तरतूद आहे का, हेही पडताळणे गरजेचे आहे.

हेही वाचा

Back to top button