

पौड : पुढारी वृत्तसेवा : मुठा (ता. मुळशी) घाटात माती वाहतूक करणार्या ट्रकच्या धडकेत पिरंगुट येथील तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक व मालकावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी. अवैध माती वाहतूक करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पिरंगुट येथील तरुणांनी पौड पोलिसांकडे केली आहे. तीन दिवसांपूर्वी मुठा घाटात डंपरच्या धडकेत कारमधील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याची पत्नी व मुलगीही गंभीर जखमी झाली.
विक्रांत अण्णा निकटे (वय 28, रा. पिरंगुट) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अवैध माती वाहतूक करणार्या डंपरच्या धडकेत निकटेचा मृत्यू झाला. याबाबत डंपरचालकावर गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप पिरंगुट ग्रामस्थांनी केला आहे. या अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. पुढील घटना थांबवण्यासाठी पौड पोलिस सज्ज असल्याचे पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव, उपनिरीक्षक सुधीर कदम यांनी सांगितले.
मुठा खोरे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. तरीदेखील काही गावांत मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून मातीची विक्री करण्यात येत आहे. मातीचे ठेके अनेक पुढारी घेत आहेत. ठेकेदारांची वाहने सुसाट जात आहेत. परंतु, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हेही वाचा