Pune News : डेंग्यूच्या लसीवर ससूनमध्ये संशोधन | पुढारी

Pune News : डेंग्यूच्या लसीवर ससूनमध्ये संशोधन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांमध्ये डेंग्यूच्या संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. लस विकसित झाल्यास डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे नॉलेज क्लस्टर (पीकेसी) यांच्या संयुक्त प्रकल्पाद्वारे लसीवरील संशोधनाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या डेंग्यूवरील लस अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध आहेत. परंतु, तेथील जीनोम्स वेगळे असल्याने ती लस भारतात उपयुक्त ठरत नाही.

आधी एखाद्या विषाणुजन्य आजाराचा संसर्ग झाला असेल आणि त्यातच डेंग्यूचा संसर्ग झाला तर धोका अधिक वाढतो. लसीमध्येही अर्धमेल्या स्वरूपात त्याचे विषाणू असतात. लस दिल्याने धोका निर्माण होईल का? हेदेखील या अभ्यासातून पाहण्यात येणार आहे. डेंग्यूच्या लसीच्या संशोधनासाठी रॉकफेलर फाउंडेशनने ’पीकेसी’ला निधी मंजूर केला आहे. हा प्रकल्प ‘पीकेसी’चा असून, यामध्ये बी. जे. मेडिकल हे संशोधन करण्याची भूमिका पार पाडत आहे. संशोधन यशस्वी झाल्यास तो डाटा राज्य शासन, केंद्र शासनाला देऊन त्यावर कंपन्यांकडून लस तयार करता येणे शक्य होणार आहे.

शंभर रक्त नमुने घेणार

कोविडप्रमाणेच भारतात डेंग्यू विषाणूंचे हजारांहून अधिक सीक्वेन्सेस म्हणजेच वेगवेगळे बदल झालेले आहेत. या संशोधनातून डेंग्यूचे कोणते जीनोम्स म्हणजेच व्हेरिएंट आहेत, हे कळेल. सध्या आपल्याकडे केवळ चार ते पाच जीनोम्सची माहिती उपलब्ध आहे. नवीन अभ्यासात डेंग्यू झालेल्या रुग्णांचे सुमारे शंभर रक्त नमुने घेण्यात येतील, अशी माहिती बी. जे. मेडिकल कॉलेजमधील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button