अजित पवारांनी ठोकला शड्डू; आता काका-पुतण्यात आरपारची लढाई | पुढारी

अजित पवारांनी ठोकला शड्डू; आता काका-पुतण्यात आरपारची लढाई

सुहास जगताप

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आपल्या बारामती दौर्‍यात थोडेसे संयमी धोरण ठेवणार्‍या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवार (दि. 24)च्या दौर्‍यात मात्र आक्रमकता धारण केली. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पूर्णपणे भिडण्याचे संकेत दिल्याने आता काका-पुतण्यात आरपारची लढाई रंगणार, हे निश्चित झाले आहे.

बारामतीच्या दौर्‍यात अजित पवार यांनी थेट वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडताना शरद पवारांनी कशी बंडखोरी करून वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचीच आठवण बारामतीकरांना करून दिली. प्रत्येकाचा एक काळ असतो, जास्त वय झाल्यावर आराम करायचा असतो, पुढच्या पिढीला मार्गदर्शन करायचे असते, असेही त्यांनी शरद पवार यांना सुनावले. हे सुनावत असताना कार्यकर्त्यांनाही अजित पवार यांनी सोडले नाही, ‘आता इकडे-तिकडे असे दोन्हीकडे नको एक भूमिका घ्या, आता तुम्हाला माझे ऐकावे लागेल, ज्यांना माझ्याबरोबर राहायचे त्यांनी राहावे, ज्यांना तिकडे जायचे त्यांनी तिकडे जावे’ असे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता शरद पवार यांच्याशी थेट दोन हात करण्याची तयारी त्यांनी केली असल्याचे दिसून आले. पुणे जिल्ह्यात दोन्ही पवार कधीही एकत्र येतील अशी मनस्थिती अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची होती, ती झटकून टाकण्याचे काम अजित पवार यांच्या या भूमिकेने केले आहे. बारामतीमध्ये अजित पवार आल्यावर जमणारे नेते, पदाधिकारी खासदार सुप्रिया सुळे आल्यानंतरही त्याच्या भोवती असत, ते हेरून अजित पवार यांनी योग्य ठिकाणी आपल्या स्टाईलने सुनावत दोन्ही डगरीवर असणार्‍यांना चांगलाच इशारा दिला आहे.

बारामतीची लढत रंगतदार होणार

सोमवारी (दि. 25) पुण्यातही अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्यावर आक्रमक टीका करत आपली भूमिका कायम ठेवल्याने अजित पवार यांची दिशा स्पष्ट झाल्याची तसेच त्यांनी नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते यांना योग्य संदेश दिल्याची चर्चा होती. अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार येणार हे स्पष्ट झाल्याने ही निवडणूक रंगणार आहे.

हेही वाचा

Back to top button