Sunil Gavaskar On Sanju Samson : सुनील गावसकरांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले; ‘संजू नशीब…’ | पुढारी

Sunil Gavaskar On Sanju Samson : सुनील गावसकरांची मोठी भविष्यवाणी, म्हणाले; ‘संजू नशीब...’

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sunil Gavaskar On Sanju Samson : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणा-या संजू सॅमसनची सर्वत्र चर्चा रंगली आहे. भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही त्याचे कौतुक केले आहे. या शतकामुळे संजूच्या करिअरला निर्णायक वळण मिळेल, असे भविष्यवाणी त्यांनी केली आहे. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत मांडले.

गावसकर पुढे म्हणाले, या शतकामुळे संजूचे करिअर बदलणार आहे. तो प्रतिभावान खेळाडू आहे हे सर्वांना माहीत आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना तो आपल्याकडील ही प्रतिभा दाखवण्यात अपयशी ठरत होता. इतरांसोबत तो स्वतःसाठी त्याचे प्रदर्शन करण्यात कमी पडला. पण आता द. आफ्रिकेविरुद्धची त्याची शतकी खेळी पाहता आता त्याच्या करियरला नक्कीच निर्णायक वळण मिळेल,’ असे त्यांनी सांगितले. (Sunil Gavaskar On Sanju Samson)

पार्लमध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सॅमसनने उत्कृष्ट शतक झळकावले. यजमान संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर रजत पाटीदार आणि साई सुदर्शन लवकर बाद झाले. भारताने 49 धावांवर दोन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कर्णधार केएल राहुलही 101 धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला संजू सॅमसनने तिलक वर्मासोबत संघाचा डाव जबाबदारीने सांभाळला. दोघांमध्ये 116 धावांची भागीदारी झाली. 217 च्या एकूण धावसंख्येवर तिलक (52) तंबूत परतला. या सगळ्यात संजूने वनडे करिअरमधील आपले पहिले शतक झळकावले. त्याने 114 चेंडूत 108 धावा केल्या.

संजू सॅमसनने वनडेच्या 14 डावात 56.67 च्या सरासरीने आणि 99.61 च्या स्ट्राईक रेटने 510 धावा केल्या आहेत. आता त्याच्या नावावर वनडेत एक शतक आणि तीन अर्धशतके आहेत. संघात त्याच्या फलंदाजीचा अजून पक्का नाहीय. कारण तो सर्वाधिक वेळा पाच आणि त्यानंतर सहाव्या क्रमांकावर खेळताना दिसला आहे. त्याने पाचव्या क्रमांकावर सहा डाव आणि सहाव्या क्रमांकावर चार डाव खेळले आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावरील संजूची ही तिसरी इनिंग होती. या क्रमांकावर त्याने आपले एकमेव शतक झळकावले आहे. तर चार, पाच आणि सहा क्रमांकावर त्यांने अर्धशतके फटकावली आहेत. भविष्यात संजू तिसऱ्या क्रमांकावर दिसेल अशी चर्चा आहे. (Sunil Gavaskar On Sanju Samson)

‘शतक झळकावून बाउन्स बॅक’

गेले तीन-चार महिने माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक होते. पण यादरम्यान मी स्वतःवर काम करत राहिलो आणि पहिले एकदिवसीय शतक झळकावून बाउन्स बॅक केले. संधी मिळताच मी स्वत: ला सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. माझ्या या शतकी खेळीने संघाच्या विजयाला हातभार लागला. हे साध्य करताना मला खूप आनंद होत आहे. मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मेहनत घेत आहे आणि त्याचे परिणाम आता माझ्या वाट्याला येत आहेत. मी सर्वांचा आभारी आहे, अशी भावना संजू सॅमसनने व्यक्त केली.

Back to top button