IND vs SA Test Series : विराट कोहली अचानक भारतात परतला! ऋतुराज गायकवाड कसोटी मालिकेतून बाहेर

IND vs SA Test Series : विराट कोहली अचानक भारतात परतला! ऋतुराज गायकवाड कसोटी मालिकेतून बाहेर

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA Test Series : द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली द. आफ्रिकेतून अचानक मायदेशी परतला आहे. तर सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे.

किंग कोहली भारतात का परतला?

वृत्तानुसार, स्टार फलंदाज विराट कोहलीही कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे भारतात परतला आहे. अशा परिस्थितीत तो प्रिटोरिया येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय इंट्रा-स्क्वॉडच्या सामन्यात सहभागी झालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, कोहली तीन दिवसांपूर्वी मुंबईला परतला. त्यासाठी त्याने बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाची परवानगी घेतली होती. तो शुक्रवारी (22 डिसेंबर) द. आफ्रिकेत परतेल अशी शक्यता आहे. त्यामुळे तो 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत खेळताना दिसेल.

गायकवाड कसोटी मालिकेतून का बाहेर पडला?

पोर्ट एलिझाबेथ येथे 19 डिसेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या वनडेत ऋतुराज गायकवाडच्या बोटाला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला. या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरू शकलेला नाही. ज्यामुळे त्याला तिस-या वनडेतही खेळता आले नाही. तिस-या वनडेत त्याच्या जागी रजत पाटीदारला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली होती.

सध्या ऋतुराज गायकवाड हा बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. दोन्ही कसोटी सामन्यांपूर्वी तो बरा होण्याची कोणतीही शक्यता नाही. परिणामी संघ व्यवस्थापनाने त्याला तत्काळ मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला. तो शनिवारपर्यंत भारतात पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

कसोटी मालिकेसाठी ऋतुराजच्या बदली खेळाडूची घोषणा झालेली नाही. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्याच्या जागी द. आफ्रिकेत उपस्थित असलेल्या भारत-अ संघातील खेळाडूंना संधी मिळू शकते. यात अभिमन्यू ईश्वरन आणि सरफराज खान यांचे नाव आघाडीवर आहे. (IND vs SA Test Series)

शमी, इशानही कसोटी मालिकेतून बाहेर

गायकवाडआधी यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हे देखील कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत. इशानने वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेतून आपले नाव मागे घेतले आहे. त्याने बीसीसीआयकडे याबाबत परवानगी मागितली होती, जी बीसीसीआयने मान्य केली आहे. दरम्यान, इशानच्या जागी केएस भरत हा कसोटी संघाचा भाग आहे. भरताशिवाय केएल राहुल हा संघातील दुसरा यष्टीरक्षक असेल. (IND vs SA Test Series)

प्रसिद्ध कृष्णाला पदार्पणाची संधी

इशानपूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक 24 बळी घेणा-या शमीला घोट्याला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कसोटी मालिकेसाठी संघातील सर्व खेळाडू 15 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले होते, त्यात शमीचा समावेश नव्हता. तो फिटनेस चाचणीही उत्तीर्ण होऊ शकला नव्हता, त्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. शमीच्या अनुपस्थितीत प्रसिद्ध कृष्णाला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे उर्वरित दोन वेगवान गोलंदाज असतील. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त असेल तर शार्दुल ठाकूर हा चौथा वेगवान गोलंदाजही ठरू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news