सिंहगड रस्ता भागात समान पाणीवाटप रखडले; टंचाईमुळे नागरिक त्रस्त | पुढारी

सिंहगड रस्ता भागात समान पाणीवाटप रखडले; टंचाईमुळे नागरिक त्रस्त

दत्तात्रय नलावडे

खडकवासला : जुन्या हद्दीसह समावेश केलेल्या सिंहगड रस्ता परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करूनही समान पाणीवाटप रखडले आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत काळातील पाणी योजना वाढत्या लोकसंख्येला अपुर्‍या पडत असल्याने रोजच्या पाणीटंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. धायरी, किरकटवाडी, खडकवासला, नांदेड आदी परिसरात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे.

परिसरात दाट लोकवस्त्यांसह सोसायट्यांचे मोठे जाळे पसरले आहे. अपुर्‍या व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे सोसायट्यांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. त्यासाठी एका सोसायटीला वर्षाला चार ते पाच लाख रुपये मोजावे लागत आहेत. धायरी परिसरात पालिकेचे टँकर मोफत पाणीपुरवठा करत असले तरी नांदेड, किरकटवाडी, खडकवासला भागात पालिकेचे टँकर सुरू नाहीत, त्यामुळे सोसायट्यांना विकतचे टँकर घ्यावे लागत आहेत.

माजी उपमहापौर प्रसन्न जगताप म्हणाले की, खडकवासला धरण जवळ असूनही या भागातील चार ते पाच लाखांवर नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. समान पाणीवाटप योजनेंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या. मात्र, योजनाच प्रत्यक्ष सुरू झाली नाही. जुन्या हद्दीपेक्षा नवीन हद्दीत समस्या गंभीर बनली आहे. किरकटवाडी येथील रहिवासी नरेंद्र हगवणे म्हणाले, ’ग्रामपंचायत काळात कसेबसे पाणी मिळत होते. मात्र, महापालिकेत समावेश झाल्यापासून पाणीपुरवठा कोलमडला आहे. महापालिका कोट्यवधी रुपयांचा कर गोळा करत आहे. पाणीपुरवठ्यावर कोट्यवधींचा चुराडा होऊनही समस्या कायम आहे.

बंदिस्त जलवाहिनीतून पाणी द्यावे

सुधारित पाणी विकास आराखड्याप्रमाणे पाणीपुरवठा होण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे नांदेड, धायरी, नर्‍हे आदी ठिकाणी बंदिस्त जलवाहिनीतून नवीन कनेक्शन देण्यात यावे, अशी मागणी खडकवासला भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष अतुल चाकणकर व खडकवासला भाजपचे उपाध्यक्ष रूपेश घुले यांनी केली आहे.

परिसरातील सोसायट्यांत ‘पाणीबाणी’

धायरी, नर्‍हे , किरकटवाडी आदी ठिकाणच्या सोसायट्यांसह उंचसखल भागात अनियमित व अपुर्‍या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खाजगी टँकरची मागणीही वाढली आहे. या भागात बाराही महिने ’पाणीबाणी’ असल्याचे गंभीर चित्र आहे.

सिंहगड रस्त्यासह समाविष्ट गावांत नव्याने पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांमार्फत सुधारित विकास आराखडा तयार केला जात आहे.
– दीपक सपकाळ, उपविभागीय अभियंता, पाणीपुरवठा विभाग

सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायत काळातील पाणी योजना जीर्ण झाल्या आहेत. कर भरूनही किरकटवाडी येथील सोसायट्यांत पाणीच मिळत नाही.
-रमेश करंजावणे, उपाध्यक्ष, खडकवासला मनसे

सिंहगड रस्त्यासह समाविष्ट गावांत नव्याने पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांमार्फत सुधारित विकास आराखडा तयार केला जात आहे.

– दीपक सपकाळ, उपविभागीय अभियंता, पाणीपुरवठा विभाग

सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामपंचायत काळातील पाणी योजना जीर्ण झाल्या आहेत. कर भरूनही किरकटवाडी येथील सोसायट्यांत पाणीच मिळत नाही.

-रमेश करंजावणे, उपाध्यक्ष, खडकवासला मनसे

हेही वाचा

Back to top button