आरटीओला पीयूसी मेहरबान; दंडवसुलीतून तिजोरीत 29 लाख जमा | पुढारी

आरटीओला पीयूसी मेहरबान; दंडवसुलीतून तिजोरीत 29 लाख जमा

राहुल हातोले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत चार हजार चारशे दहा वाहनांची तपासणी केली. यामध्ये पीयूसी नसलेल्या 1 हजार 378 वाहनचालकांवर कारवाई करून 29 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

आरटीओचे भरारी पथक नियुक्त

वाहन चालविताना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढणे आवश्यक आहे. अन्यथा वाहतूक विभाग अथवा आरटीओच्या वतीने कारवाई केली जात आहे. आरटीओच्या भरारी पथकाकडून पीयूसी देणार्यांचीदेखील तपासणी केली जात आहे. वाहनचालकाकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) असणे अनिवार्य आहे. चालकाकडे पीयूसी नसेल तर दंडात्मक कारवाई केली जाते.

पीयूसी काढण्यासाठी मनमानी दर

पीयूसीसाठी दर हे निश्चित केले आहेत. त्याप्रमाणे दुचाकीसाठी 50 रुपये, चारचाकी (पेट्रोल) 125 रुपये तर चारचाकी (डिझेल) 150 रुपये आकारले जातात. शिवाय रिक्षासाठी 100 रुपये आकारले जातात. मात्र, शहरात बर्‍याच ठिकाणी निश्चित केलेल्या दरापेक्षा दहा ते वीस रुपये अधिक घेतले जाताना दिसून येत आहे. याबाबत आरटीओने तक्रार देण्याचे आवाहन केले आहे.

किती आकारला जातो दंड

पीयूसी नसेल तर दुचाकीसाठी दोन हजार आणि चारचाकीसाठी चार हजार रुपये दंडाची तरतूद आहे. पीयूसी प्रमाणपत्र नसल्यास वाहनचालकाचा वाहन चालविण्याचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात येऊ शकतो.

हेही वाचा

Back to top button