कचरा डेपोसाठी पुनावळेऐवजी इतर जागेचा शोध घेणार : मंत्री उदय सामंत | पुढारी

कचरा डेपोसाठी पुनावळेऐवजी इतर जागेचा शोध घेणार : मंत्री उदय सामंत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुनावळे परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढल्याने तेथील नागरिकांचा नियोजित घनकचरा व्यवस्थापन डेपोस प्रचंड विरोध आहे. तसेच, वन विभागाने जागा ताब्यात दिलेली नाही. त्यामुळे पुनावळे येथे कचरा डेपो होणे अशक्य आहे.
त्या ठिकाणी डेपो न करता पर्यायी जागेचा शोध घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी हिवाळी अधिवेशनात सोमवारी (दि. 18) सांगितले. त्यामुळे पुनावळे परिसरातील नागरिकांनी जल्लोष करीत त्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले.

शासनाच्या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत

त्या संदर्भात चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. ते म्हणाले की, पुनावळे परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती निर्माण झाली आहे. तसेच, अनेक शाळा आहेत. अन्य बाबी आहेत. त्यामुळे या ठिकाणी डेपो प्रकल्पास विरोध आहे. वन विभागानेही अद्याप महापालिकेच्या ताब्यात तेथील जागा दिलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी डेपो होणे अशक्य आहे. हा डेपो तेथे न करता पर्यायी जागा महापालिकेकडून शोधली जाईल. पुनावळेच्या नियोजित जागेवर कचरा डेपो होणार नसल्याने पुनावळे परिसरातील नागरिकांनी एकच जल्लोष केला आहे. शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.

पुनावळे येथील वन विभागाच्या जागेत कचरा डेपो होऊ देणार नाही, यासाठी पाठपुरावा केला आणि अखेर निर्णय लागला. जनतेचा लोकप्रतिनिधी या नात्याने हिवाळी अधिवेशनात पुनावळे कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लावला. आपल्या सर्वांसाठीच हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे. कारण होणार्‍या प्रकल्पामुळे सर्वच स्तरातील नागरिकांना कचरा डेपोचा त्रास होणार होता. तसेच, झाडांची कत्तलदेखील होणार होती. अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

– अश्विनी जगताप, आमदार

हेही वाचा

Back to top button