बाबा लगीन ! जुलैपर्यंत तब्बल ६३ लग्नाचे मुहूर्त, एकाच ठिकाणी चेक करा यादी ! | पुढारी

बाबा लगीन ! जुलैपर्यंत तब्बल ६३ लग्नाचे मुहूर्त, एकाच ठिकाणी चेक करा यादी !

अंबादास बेनुस्कर : पिंपळनेर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे विवाहाचे दोन हंगाम मंदीत अडकले. विवाहाशी संबंधित सर्वच व्यवसायांना आर्थिक झळ बसली. बँड व्यावसायिक कर्जबाजारी झाले. आता कोरोना प्रतिबंधक लसीमुळे जनजीवन पूर्वपदावर आहे. आता खानदेशात तुलसी विवाहानंतर विवाहाची धूम सुरू होणार आहे. जुलैपर्यंत ६३ मुहूर्त आहेत. यामुळे विवाहेच्छुकांच्या मनोकामना पूर्ण होणार आहेत.

खानदेशात आषाढी ते कार्तिकी एकादशीपर्यंत विवाह होत नाहीत. यास ‘ देव बसणे ‘ असे म्हटले जाते. तुलसी विवाहापासून बँड वाजण्यास सुरवात होते. यास ‘देव उठणे’ असे म्हटले जाते. कोरोनामुळे दीड दोन वर्षांपासून रखडलेल्या विवाहांना चालना मिळणार आहे. विवाह तिथीही भरगच्च आहेत. मे आणि जूनच्या सुट्ट्यांमध्ये अधिक विवाह तिथी आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचीही मोठी सोय होणार आहे.

विवाहाशी संबंधित बँड, मंडप, मंगल कार्यालये, सोने व कापड बाजार आदी अडचणीत सापडलेल्या व्यवसायांना तेजी मिळणार आहे. यामुळे या व्यावसायिकांमध्ये उत्साह संचारला आहे.

गुडघ्याला बाशिंग पण…

विवाहासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना सावधान शुभमंगल म्हणण्याची लग्नघटिका जवळ येऊन ठेपली आहे. साखरपुडा झालेले उपवरांचे नातेवाईक जवळची तिथी पकडण्याची धावपळ करत आहेत.

नोव्हेंबर ते जुलैपर्यंत विवाहाच्या तिथी

▪️नोव्हेंबर: २०,२१,२९,३०

▪️डिसेंबर :१, ७,८,९,१३,१९,२४,२६,२७,२८,२९

▪️जानेवारी:२०२२ : २०,२२,२३,२७,२९ :

▪️फेब्रुवारी: ३ , ५,६,७,१०,१७,१९ ▪️मार्च: २५,२६,२७,२८

▪️एप्रिल:१५,१७,१९,२२,२४,२५

▪️मे: ४,१०,१३,१४,१८,२०,२१,२२,२५ , २६,२७,

▪️जून :१,६,८,११,१३,१४, १५ , १६,१८,२२

▪️जुलै : ३,५,६,७,८,९,

विवाहाच्या भरगच्च तिथी आहेत. त्या तिथीनुसार विवाह होणे जेवढे योग्य आहे तेवढेच योग्य वयात योग्य वेळेत विवाह होणेही आवश्यक आहे. त्यासाठी कोणताही दिवस शुभ मानून बोहल्यावर चढण्यास हरकत नाही.
– राजेंद्र जोशी,(भटजी)पिंपळनेर.

Back to top button