Terrorism : दहशतवादीच दहशतीखाली! | पुढारी

Terrorism : दहशतवादीच दहशतीखाली!

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : पाकिस्तानात लपून बसलेल्या भारतातील 48 मोस्ट वाँटेड गुन्हेगारांचे जणू काऊंटडाऊन सुरू झालेले आहे. आजअखेर भारताच्या 22 मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचा पाकिस्तानच्या भूमीवर खात्मा झाला आहे. या देशात दहशतवादीच आता दहशतीच्या छायेत आहेत! जरा कुठे काही वाजले की, ‘भागो, भारत आया’ अशी घबराट सध्या पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, हिजबूल मुजाहिदीनच्या तळांतून पसरलेली आहे. (Terrorism)

हाफिज सईदचा भाऊ हमीद, अल बद्र कमांडर सय्यद खालिद, मुफ्ती कैसर, लष्कर कमांडर अक्रम गाझी, हिजबूल कमांडर बशीर, लष्करचे दहशतवादी सरदार हुसैन आणि रेहमान, जैश कमांडर दाऊद मलिक अशी अलीकडच्या काळात पाकमध्ये ठोकल्या गेलेल्या भारताच्या गुन्हेगारांची ही लांबलचक यादी आहे. या सगळ्यांच्या एकापाठोपाठ खात्म्यानंतर, पाक गुप्तचर संस्था आयएसआयच्या कथित सुरक्षित छताखाली परवापरवापर्यंत मोकाट, मजेत असलेले अनेक दहशतवादीच आता दहशतीच्या छायेत आहेत. त्यांचे मोबाईल फोन बंद आहेत. इतकेच काय नमाज पढण्यासाठी मशिदीत जाणेही त्यांनी बंद केले आहे. दाऊद असो की हाफीज, पाकिस्तानातील सूत्रांच्या माहितीनुसार हे सारेच नॉट रिचेबल आहेत. ते दिसेनासे झालेले आहेत. (Terrorism)

खात्मा झालेल्यांची ही यादी

मौलाना रहीम (जैश) : पुलवामाचा सूत्रधार
जाहिद मिस्त्री (हिजबूल) : कंधार विमान अपहरण
मुल्ला बर्‍हुर (जैश) : कुलभूषण जाधव यांचे अपहरण
ख्वाजा शाहिद : जम्मूमधील आर्मी कॅम्पवर हल्ला
परमजितसिंग पंजवार : पंजाबात दहशतवाद
शाहिद लतीफ (जैश) : पठाणकोट तळावर हल्ला
हंजला अदनान (तय्यबा) : उधमपूर बीएसएफ तळावर हल्ला

पाकमध्ये भारताचे हे टॉप 5 वाँटेड

  • दाऊद इब्राहिम : डी कंपनीचा म्होरक्या, 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा गुन्हेगार
  • हाफिज सईद : लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या, मुंबई 26/11 चा मास्टरमाईंड
  • मसूद अझहर : जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या, संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार
  • टायगर मेमन : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सहभागी. मुंबई हल्ल्यातही सहभाग
  • सय्यद सलाऊद्दीन : हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या, काश्मीरमधील दहशतवादाची सूत्रे

दहशतवाद्यांच्या हत्येची मालिका हाफिज सईदच्या घरावरील हल्ल्यापासून 2021 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून सर्व हत्यांची एकच पद्धत आहे. दुचाकीस्वार मुले येतात आणि पसरवणार्‍या दहशतवाद्यांना मारून पळून जातात. विरोधी देशाची गुप्तचर यंत्रणा यामागे असल्याचे तपासाधिकारी यांचे म्हणणे आहे. एक निवृत्त पाकिस्तानी अधिकारी म्हणतो, भारताने हस्तकांचे जाळे स्थानिक पातळीवर तयार केले आहे.

Back to top button