Pimpri News : मराठा आरक्षणासाठी शहरातील आमदारांना साकडे | पुढारी

Pimpri News : मराठा आरक्षणासाठी शहरातील आमदारांना साकडे

पिंपरी : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न येत्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लागावा, यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या (पिंपरी-चिंचवड) वतीने मंगळवारी (दि. 5) शहरातील आमदारांची भेट घेण्यात आली. तसेच, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन संबंधित आमदारांनी शिष्टमंडळाला दिले. येत्या 7 तारखेपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने आमदारांची भेट घेतली.

मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळात प्रकाश जाधव, सतीश काळे, वैभव जाधव, प्रकाश बाबर, मीरा कदम, जयराम नाणेकर आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आरक्षणाच्या मागणीचे निवेदन आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी स्वतः स्विकारले. मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकाऊ आरक्षण देण्यासाठी सरकारकडे पाठपुरवठा करण्याचे आश्वासन शहरातील सर्व आमदारांनी शिष्टमंडळाला दिले. मराठा समाजास कायमस्वरूपी टिकाऊ असे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे. राज्यातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले देण्यात यावे. सर्व समाजाला न्याय देण्यासाठी जातीनिहाय जनगणना करावी. आवश्यक असेल तर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून घटना दुरुस्ती करावी, आदी मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या (पिंपरी चिंचवड) वतीने निवेदनाद्वारे शहरातील सर्व आमदारांना करण्यात आल्या.

हेही वाचा

Back to top button