लीप वर्ष 2024 मधील ‘पंचक’ची नवलाई : शतकातील दुर्मीळ योगायोग | पुढारी

लीप वर्ष 2024 मधील ‘पंचक’ची नवलाई : शतकातील दुर्मीळ योगायोग

दीनानाथ द. गोरे

पुणे : इंग्रजी वर्ष 2023चा शेवटचा महिना सुरू आहे. त्यामुळे 2024 या नव्या वर्षाची चाहूल आणि येणार्‍या वर्षात नवे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या वर्षात शतकातील काही योगायोग जुळून येणार आहेत. त्यातील सर्वांत महत्त्त्वाचे म्हणजे यंदा ‘पंचका’चा योग आहे. या शतकात प्रथमच 2024 या लीप वर्षात फेब्रुवारीत 5 गुरुवार असणार आहेत. शिवाय, त्यातील एका गुरुवारी (22 फेब्रुवारी) गुरू पुष्यामृत योग असणार आहे. वर्षात 5 गुरू पुष्यामृत योग, श्रावणात 5 सोमवार, 5 महिन्यांतील 17 तारखांना (रविवारसह) सुट्या आणि वर्षातील 13 अमावास्यांपैकी (डिसेंबरमध्ये 1 व 30 तारखांना अमावास्या) 5 अमावास्यांना (रविवारसह) सुट्या असणार आहेत. 5 शुक्रवारी सार्वजनिक सुट्या असणार आहेत.

2024 या वर्षात तारखेने मिळणार्‍या 19 फेब्रुवारी (शिवजयंती), 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 14 एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), 1 मे (महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन), 2 ऑक्टोबर (महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती) आणि 25 डिसेंबर (नाताळ व अटलबिहारी वाजपेयी जयंती) या 7 सुट्या 2024 मध्ये आहेतच. पारसी नववर्ष दिन 15 ऑगस्टला आहे. लीप वर्षात जानेवारी, एप्रिल व जुलैचे कॅलेंडरचे पान सारखे (तारीख-वार) असते. फक्त एप्रिल 30 दिवसांचा महिना त्यामुळे 2024 या लीप वर्षाची सुरुवात (1 जानेवारी) सोमवारने होणार, आर्थिक वर्ष 2024-2025 ची सुरुवातही (1 एप्रिल) सोमवारने व जुलैची सुरुवातही (1 जुलै) सोमवारनेच होणार. 11 जानेवारीला लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी गुरुवारी, 11 एप्रिलला महात्मा फुले जयंती गुरुवारी व जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै ला गुरुवारच आहे.

लीप वर्षात फेब्रुवारी व ऑगस्टचे कॅलेंडरचे पान सारखे (तारीख-वार) असते. त्यामुळे 1 फेब्रुवारी व 1 ऑगस्टला गुरुवार (2024 मध्ये) आहे. 13 फेब्रुवारीला श्रीगणेश जयंती मंगळवारी (विनायक चतुर्थी, अंगारक योग) व 13 ऑगस्टला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी पण मंगळवारीच आहे. फेब्रुवारी 29 दिवसांचा आहे. मार्च, नोव्हेंबरचे कॅलेंडरचे पान दरवर्षी सारखे (तारीख-वार) असते. फक्त नोव्हेंबरचे दिवस 30, त्यामुळे 3 मार्चला श्री गजानन महाराज प्रकट दिन रविवारी असून, 3 नोव्हेंबरला भाऊबीज रविवारीच आहे. सप्टेंबर व डिसेंबरचे कॅलेंडरचे पान (तारीख-वार) सारखे, त्यामुळे 1 सप्टेंबर व 1 डिसेंबरला रविवार!

निवडणुका, ऑलिम्पिक,

टी-20 ‘वर्ल्ड कप’ अन् शैक्षणिक धोरण भारतात व अमेरिकेत होणार्‍या निवडणुका, ऑलिम्पिक सामने व 4 ते 30 जूनदरम्यान क्रिकेटचा टी-20 ‘वर्ल्ड कप’ आणि नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, यामुळे 2024 साल सर्वांच्या लक्षात राहील.

सुरुवात सोमवार, तर शेवट मंगळवारने

या शतकात प्रथमच 53 सोमवारबरोबर 53 मंगळवार असणार आहेत. यापूर्वी 1996 या लीप वर्षात 53 सोमवारबरोबर 53 मंगळवार आले होते. 1996 चे कॅलेंडर (तारीख-वार सारखे) 28 वर्षांनी 2024 मध्ये आले असल्याने वर्षाची सुरुवात (1 जानेवारी) सोमवारने व वर्षाचा शेवट (31 डिसेंबर) मंगळवारने होणार आहे (1996 सालाप्रमाणेच).

काही तारखा 2005 प्रमाणेच

या शतकात प्रथमच 24 पैकी 15 सार्वजनिक सुट्या 2005 सालाप्रमाणेच त्या त्या तारखांना आल्या आहेत. 2005 सालच्या तिथी (प्रतिपदा, पौर्णिमा, अमावास्या इ.) 19 वर्षांनी 2024 मध्ये आल्याने 2005 सालाप्रमाणेच 8 मार्चला (जागतिक महिला दिन) महाशिवरात्र, 9 एप्रिलला गुढीपाडवा (चैत्र शु. प्रतिपदा), 7 सप्टेंबरला श्रीगणेश चतुर्थी (भाद्रपद शु. चतुर्थी) व 12 ऑक्टोबरला दसरा 2005 प्रमाणे 2024 मध्ये आहे.

रविवार अमावास्या अन् पाच गुरुपुष्यामृत

25 जानेवारी, 22 फेब्रुवारी, 26 सप्टेंबर, 24 ऑक्टोबर व 21 नोव्हेंबर अशा 5 दिवशी गुरुपुष्यामृत योग असून, ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन लागोपाठच्या महिन्यांत अमावास्या तिथीला रविवारसह सुटी आहे. 2 ऑक्टोबरला भाद्रपद अमावास्या या दिवशी बुधवारी सुटी, तर 1 नोव्हेंबरला ‘आश्विन अमावास्या’ (लक्ष्मीपूजन) या दिवशी शुक्रवारी सुटी आहे. 1 डिसेंबरला ‘कार्तिक अमावास्या’ या दिवशी रविवारची सुटी आहे. 10 मार्चला (सावित्रीबाई फुले स्मृतिदिन) ‘माघ अमावास्या’ या दिवशी रविवारची सुटी, तर 4 ऑगस्टला ‘जागतिक मैत्री दिनाला’ रविवारची सुटी, ‘आषाढ अमावास्या’ या दिवशी आहे 17 मार्च व 17 नोव्हेंबरला रविवारची सुटी, तर 17 एप्रिलला श्रीरामनवमीची, 17 जूनला बकरी ईदची व 17 जुलैला मोहरमची सुटी.

हेही वाचा

Back to top button