Pune Drugs Case : थ्री-स्टेप फॉर्म्युला ‘ललित’वर भारी!  | पुढारी

Pune Drugs Case : थ्री-स्टेप फॉर्म्युला ‘ललित’वर भारी! 

अशोक मोराळे

 पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रगतस्कर ललित पाटील प्रकरणाची पाळेमुळे खोदून आतापर्यंत तब्बल अठ्ठावीस जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामध्ये ललित पाटीलचे ड्रग रॅकेटमधील साथीदार आणि त्याला विविध प्रकारे मदत करणार्‍यांचा समावेश आहे. त्यासाठी गुन्हे शाखेने थ्री-स्टेप फॉर्म्युल्याचा  अतिशय प्रभावी वापर केला आहे. ललित पाटीलप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात तेरा जणांना अटक करण्यात आली, तर ललितने पळ काढल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात पंधरा जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी, ससून रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर आणि येरवडा कारागृहातील पोलिस शिपाई, कर्मचारी, डॉक्टर यांचा सहभाग आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
ललित पाटील वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली ससून रुग्णालयात दाखल असताना ड्रगच्या विक्री रॅकेटमध्ये कार्यरत होता. खरेतर त्याची पुण्यातील ही पहिलीच डील होती. ससूनच्या प्रवेशद्वारावर अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग विक्री करताना एकाला पकडले.  ललितने पोलिसांच्या ताब्यातून ससून रुग्णालयातून पळ काढला. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी कडक कारवाई केली. त्यानंतर हे प्रकरण अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे यांच्याकडे सोपविण्यात आले. त्यांनी पोलिस, ससून रुग्णालय आणि येरवडा कारागृहापर्यंत ललितची पाळेमुळे खोदून काढून कारवाई केली. गुन्हे शाखेने केलेल्या तपासात अनेक गंभीर बाबी समोर आल्या असून, आणखी काही जणांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

असा आवळला कारवाईचा फास…

पोलिस आयुक्तांनी सुरुवातीला ससून रुग्णालयातील कैदी वॉर्ड येथे कर्तव्यावर असलेल्या  पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना निलंबित केले. पुढे कोर्ट कंपनीचे पोलिस कर्मचारी नाथाराम काळे आणि अमित जाधव या दोघांना ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी अटक केली. दोघांचे कृत्य गंभीर असल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर आता आणखी काही पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
 येरवडा कारागृहात असण्याऐवजी ललित बहुतांश कालावधी उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयात दाखल होता. तेथूनच तो आपले विलासी जीवन जगत होता. त्याची ही सजा नसून मजा सुरू होती.  त्यामध्ये  ससून रुग्णालयातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.  गुन्हे शाखेच्या रडारवर ही माहिती आल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा ससून रुग्णालयाकडे वळविला.
रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला प्रथम अटक केली. शेवते हा ललित पाटीलसह भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. सोमवारी (दि. 4) रात्री ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते याला अटक केली. यापूर्वी देवकाते याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. ललित याचा उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यात देवकाते यांनी भूमिका बजावल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पुढे कारागृहातील पोलिस शिपाई मोईस शेख आणि जेलमधील समुपदेशक सुधाकर इंगळे या दोघांना अटक करण्यात आली.  शेख हा येरवडा जेलचा कर्मचारी ससूनमधील वॉर्ड क्रमांक 16 समोर गार्ड ड्युटीस होता. 2 ऑक्टोबर रोजी ललित पाटील हा मोईस शेख याचा मोबाईल वापरून अ‍ॅड. प्रज्ञा कांबळे आणि अभिषेक बलकवडे यांच्याशी फोनवर बोलला आणि त्यानंतर पसार झाला. शेख ला कारागृह प्रशासनाने बडतर्फ केले आहे.
इंगळे हादेखील ललितच्या साथीदारांच्या संपर्कात होता. त्याने बलकवडेकडून पैसे घेतले. सोमवारी दुपारी गुन्हे शाखेच्या पथकाने येरवडा कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे यांना अटक केली. डॉ. मरसाळे हे ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. ललित पाटील याला 3 जून रोजी येरवडा कारागृहातून ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. 1 ते 3 जून दरम्यान भूषण पाटील, अभिषेकी बलकवडे आणि डॉ. संजय मरसाळे यांच्यात 19 वेळा फोनवरून संभाषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच कारागृहातील समुपदेशक सुधाकर इंगळे यांनी अभिषेक बलकवडे याच्याकडून पैसे घेतले होते. यातील 20 हजार डॉ. संजय मरसाळे यांना देण्यात आले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

पहिलाच मोक्का…

ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांवर  महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी ही कारवाई केली असून, एनडीपीएसच्या गुन्ह्यात राज्यात प्रथमच मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
 पोलिसांनी आतापर्यंत दोन गुन्ह्यांत तब्बल 28 जणांना अटक केली. पोलिस, ससून आणि कारागृहातील कर्मचारी डॉक्टरांचा त्यामध्ये सहभाग आहे. ललित आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात ललितचा वैद्यकीय उपचारांच्या नावाखाली मुक्काम होता. रुग्णालयातील आणखी काही जण पोलिसांच्या रडारवर आहेत. सहभागी असेल त्यांच्यावर गंभीर कारवाई होणार आहे.
– रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर 
हेही वाचा

Back to top button