देणगी, आहेराच्या रकमेत रुपया का वाढवतात? | पुढारी

देणगी, आहेराच्या रकमेत रुपया का वाढवतात?

नवी दिल्ली : बर्‍याच वेळा आपण पाहत असतो की मंदिरात किंवा अन्य कुठेही देणगी देत असताना तसेच लग्नासारख्या शुभकार्यावेळी आहेर म्हणून काही रक्कम देत असताना या रकमेत शेवटी एक रुपया वाढवला जात असतो. याचा अर्थ 100, 500 किंवा 1000 रुपये न देता त्याऐवजी अनुक्रमे 101, 501 किंवा 1001 रुपये दिले जातात. असे का केले जाते हे तुम्हाला माहिती आहे का? शुभ कार्याच्या रकमेत एक रुपया वाढवण्याची चार कारणे सांगितली जातात. ती अशी…

‘शून्य’ हे समाप्ती दर्शवत असते. मात्र ‘1’ हा अंक नवी सुरुवात दर्शवतो. त्यामुळे हा अतिरिक्त ‘1’ सुचवतो की रक्कम स्वीकारणार्‍या व्यक्तीला ‘शून्या’चा सामना करावा लागणार नाही.

गणिताच्या द़ृष्टीने पाहिले तर 100, 500 किंवा 1000 हे अंक विभाज्य (भाग पाडता येणारे) आहेत. मात्र 101, 501 किंवा 1001 हे अंक अविभाज्य आहेत. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हे अविभाज्य आहेत, त्यांचे तुकडे होणार नाहीत, असे शेवटच्या ‘1’ वरून सुचवले जाते.

मूळ रकमेपुढील अतिरिक्त एक रुपया हा सातत्याचे प्रतीक आहे. त्याच्यामुळे देणार्‍या व घेणार्‍यांमधील संबंध मजबूत होतात. आपले चांगले नातेसंबंध यापुढेही सुरूच राहतील असे हा रुपया सुचवतो.

हा अतिरिक्त 1 रुपया नेहमीच नाण्याच्या रूपात दिला जातो, नोटेच्या रूपात नव्हे. नाणे हे धातूपासून बनवलेले असते व धातू हे धरणीमातेच्या उदरातून येतात. अशा नाण्याला लक्ष्मीदेवीचेही एक प्रतीक मानले जाते. हा रुपया पुढील आणखी गुंतवणुकीचे, देणगीचे बीजही मानले जाते. आपले नातेसंबंध, शुभेच्छा व आशीर्वाद पुढे वृद्धिंगत होत राहतील, असे हा अतिरिक्त रुपया सांगतो.

Back to top button