महायुतीचे जागावाटप डिसेंबरमध्ये; अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वासाचा ठराव | पुढारी

महायुतीचे जागावाटप डिसेंबरमध्ये; अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वासाचा ठराव

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे जागावाटप डिसेंबरमध्ये होईल, अशी माहिती अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. तसेच गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला, असेही तटकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक मंथन शिबीराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, भाजपाचा श्री राम मंदिराचा अजेंडा असला तरी आमचा पक्ष मूळ भूमिकेपासून दूर जाणार नाही. आम्ही आमच्या विचारांशी फारकत घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत महायुती 45 जागांवर विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष मजबुतीवर भर देण्यात आला. तसेच पक्षाला पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी विचारविनिमय, शेतकर्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि सामाजिक प्रश्नावर या बैठकीत चर्चा झाल्याचे तटकरे म्हणाले.

संबंधित बातम्या

तत्पूर्वी, शिबिरात सहभागी झालेल्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना तटकरे भावुक झाले होते. ते म्हणाले, अजित पवार यांनी तुमच्या जीवावर महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी घेतली आहे ती आपल्याला पार पाडायची आहे. भिन्न विचारसरणीचे वेगवगळे पक्ष देशात एकत्र येतात तर मग आम्ही शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो तर आमचे काय चुकले, असा सवालही तटकरे यांनी उपस्थित केला.

अजित पवार यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला आहे. पक्षासाठीचे त्यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. त्यामुळे जनतेच्या हितासाठी सत्तेत सहभागी होण्याबाबत त्यांनी घेतलेला निर्णय कसा योग्य आहे हे आपण सर्वांनी कृतीतून दाखवून देऊ या, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 पैकी 43 आमदार अजित पवार यांच्या पाठीशी उभे आहेत. हे एक प्रकारे त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब आहे. छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाची बाजू लावून धरत आहेत. त्यांच्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्यापासून भूमिका असल्याचे पुन्हा एकदा तटकरे यांनी स्पष्ट केले.

आपणही पुस्तक लिहिणार : पटेल

पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांच्या ‘लोक माझ्या सांगाती’ या पुस्तकाचा उल्लेख आपल्या भाषणात करत आपणही भविष्यात पुस्तक लिहिणार असून त्यावेळी मी माझी बाजू मांडेन आणि त्यात खूप काही मटेरियल मिळेल.

भुजबळ यांची शिबिराकडे पाठ

या बैठकीकडे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद या बैठकीत?उमटू नयेत म्हणून त्यांना दूर ठेवण्यात आले का, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते.

Back to top button