IND vs AUS 2nd T20 : युवा ब्रिगेडने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा, दुसर्‍या टी-20 सामन्यात भारताचा 44 धावांनी विजय | पुढारी

IND vs AUS 2nd T20 : युवा ब्रिगेडने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा, दुसर्‍या टी-20 सामन्यात भारताचा 44 धावांनी विजय

तिरुवनंतपुरम; वृत्तसंस्था : येथील ग्रीनफिल्ड मैदानावर झालेल्या दुसर्‍या टी-20 सामन्यात यशस्वी जैस्वाल (53), इशान किशन (52) आणि ऋतुराज गायकवाड (58) यांची तगडी फलंदाजी आणि प्रसिद्ध कृष्णा, रवी बिष्णोई यांची घातक गोलंदाजी याच्या सांघिक जोरावर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर 44 धावांनी विजय मिळवला. या विजयाने भारत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा आघाडीवर आहे. मालिकेतील पुढील सामना उद्या (मंगळवारी) गुवाहटी येथे होणार आहे. (IND vs AUS 2nd T20)

भारताच्या युवा ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा आजही पालापाचोळा केला. जैस्वाल, ऋतुराज आणि इशानच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर भारताने 4 बाद 235 धावा केल्या. याचा पाठलाग करताना रवी बिष्णोईने मॅथ्यू शॉर्ट (19) आणि जोश इंग्लिश (2) यांना पॉवरप्लेमध्येच तंबूत धाडून ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुंग लावला. अक्षर पटेलने ग्लेन मॅक्सवेलला (12) जम बसू दिला नाही. सलामीपासून टिकून असलेल्या स्टिव्ह स्मिथची धडपड (19) प्रसिद्ध कृष्णाने थांबवली.

मार्कस स्टोईनिस आणि टीम डेव्हिड यांनी संघाची पडझड थांबवत धावसंख्या पुढे वाढवली. ही फुलत जाणारी भागीदारी शेवटी विष्णोेईने तोडली. त्याने डेव्हिडला (37) धावांवर बाद केले. अर्धशतकाकडे चाललेला स्टोईनिसला मुकेशकुमारने आपली शिकार बनवली. यानंतर कर्णधार मॅथ्यू वेडची बॅट तळपली, परंतु ऑस्ट्रेलियन शेपटाने फारसा प्रतिकार केला नाही. ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 9 बाद 191 धावा केल्या. कर्णधार वेड 42 धावांवर नाबाद राहिला. प्रसिद्ध कृष्णा, रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. (IND vs AUS 2nd T20)

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड व यशस्वी जैस्वाल या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सीन अबॉटने टाकलेल्या चौथ्या षटकात यशस्वीने 4, 4, 4, 6, 6 अशा 24 धावा चोपल्या. यशस्वीने स्टेडियम दणाणून सोडताना 24 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. नॅथन एलिसने हे वादळ रोखले. यशस्वी 25 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 53 धावांवर झेलबाद झाला. यशस्वी व ऋतुराज यांनी 5.5 षटकांत 77 धावांची भागीदारी केली. टी-20 क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या भारतीय फलंदाजाचा विक्रम यशस्वीने नावावर केला.

यशस्वी बाद झाल्यानंतर इशान किशन व ऋतुराज यांनी धावांचा वेग कायम राखला अन् भारताला शतकीपार पोहोचवले. इशानने उत्तम फटकेबाजी करून 32 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह 52 धावा चोपल्या आणि ऋतुराजसह 58 चेंडूंत 87 धावा जोडल्या. मार्कस स्टोईनिसने इशानला बाद केले. ऋतुराजनेही 40 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादव 10 चेंडूंत 19 धावा करून माघारी परतला. ऋतुराज 20 व्या षटकात बाद झाला. त्याने 43 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 58 धावा केल्या. रिंकूने 9 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांची नाबाद 31 धावांची खेळी केली आणि टीम इंडियाने 20 षटकांत 4 बाद 235 धावा उभ्या केल्या.

हेही वाचा :

Back to top button