Hardik Pandya in Mumbai Indians : अखेर ठरलं… हार्दिक पंड्याची घरवापसी! | पुढारी

Hardik Pandya in Mumbai Indians : अखेर ठरलं... हार्दिक पंड्याची घरवापसी!

मुंबई;  वृत्तसंस्था : मुंबई इंडियन्सचे फॅन ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते, ती अखेर समोर आली. हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सची साथ सोडून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पुन्हा दाखल झाला. हार्दिक व गुजरात फ्रँचायझी यांच्यात काहीतरी फिसकटल्याची चर्चा होती आणि त्याने मुंबई इंडियन्ससोबत चर्चा सुरू केली होती.

सायंकाळी 5.25 मिनिटांनी गुजरात टायटन्सने जेव्हा रिटेन केलेल्या म्हणजेच संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली. त्यात हार्दिक पंड्याचे नाव दिसल्याने तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते, पण रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्याची शेवटची मुदत होती परंतु ट्रेड विंडो 12 डिसेंबरपर्यंत सुरू आहे. त्यामुळे पडद्यामागून वाटाघाटी सुरू होती आणि सायंकाळी 7.25 वाजता मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्यात डील झाली. हार्दिक मुंबई इंडियन्सकडे परत आला. बीसीसीआय किंवा दोन्ही फ्रँचायझींकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही, पण पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

रिटेन यादी जाहीर केली तेव्हा मुंबई इंडियन्सकडे 15.25 कोटीच रक्कम शिल्लक होती आणि गुजरात हार्दिकला 15 कोटी देत होते. त्यामुळे मुंबईला ही डील करण्यासाठी पैसे कमी पडले होते. त्यांनी 17.5 कोटींत खरेदी केलेल्या कॅमेरून ग्रीनला आरसीबीसोबत ट्रेड करून पर्समधील रक्कम वाढवली अन् हार्दिकला मोठी रक्कम देऊन आपल्या ताफ्यात घेतले. ही रक्कम अद्याप कळलेली नाही.

सर्व संघांनी रविवारी (26 नोव्हेंबरपर्यंत) पुढील हंगामासाठी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडे सादर केली आहे. यानुसार अनेक नामवंत खेळाडूंना फ्रँचाईजींनी नारळ दिला असल्याचे दिसून आले. मुंबई इंडियन्सने त्यांचा मुख्य वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला रीलिज केले, तर चेन्नई सुपरकिंग्जने बेन स्टोक्स, कायेल जेमिनसन यांना सोडले. याशिवाय वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर याला कोलकाता नाईट रायडर्सने करारमुक्त केले आहे.

आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी पहिल्यांदाच दुबईत होणार आहे; पण त्याआधी, रिटेन यादीमुळे प्रत्येक संघाच्या पर्समधील रक्कम कमी जास्त झाली असून, संघ संयोजनही बदलले आहे.

हेही वाचा :

Back to top button