Pimpri News : ऑनलाइन विक्रीस बंदी, तरीही मिळताहेत प्रतिबंधित औषधे | पुढारी

Pimpri News : ऑनलाइन विक्रीस बंदी, तरीही मिळताहेत प्रतिबंधित औषधे

दीपेश सुराणा

पिंपरी : गर्भपाताच्या गोळ्या, झोपेच्या गोळ्या आणि कोडिंगयुक्त खोकल्याचे औषध यांच्या ऑनलाइन विक्रीला प्रतिबंध आहे. तरीही, सध्या गर्भपाताच्या गोळ्या आणि कोडिंगयुक्त खोकल्याचे औषध सहजपणे ऑनलाइन उपलब्ध असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्याशिवाय, स्टेराईड्सदेखील ऑनलाइन मिळत असल्याने त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात येणारी कारवाई ही जुजबी स्वरूपाची आहे.

केंद्र सरकारकडून ई-फार्मसी संदर्भातील नियम निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अद्याप त्याबाबत कायदा झालेला नाही. या पार्श्वभूमीवर नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 8 आठवड्यांच्या आत औषधांच्या ऑनलाइन विक्रीबाबत धोरण तयार करण्याचे आदेश दिले आहेत. औषधांच्या बेकायदा ऑनलाइन विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे. हे प्रकरण पाच वर्षांपासून न्यायालयासमोर प्रलंबित आहे.

बनावट ई-प्रिस्क्रीप्शनचा धोका

इंटरनेटवर ‘ऑनलाइन मेडीसीन’ असे सर्च केल्यानंतर सहजतेने ऑनलाइन औषध विक्री करणारी अनेक संकेतस्थळे सापडतात. या संकेतस्थळावर आपल्याला हव्या त्या औषधांची मागणी नोंदविता येते. त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन ‘अपलोड’ करावे लागते. ज्या रुग्णांकडे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसेल त्यांना दूरध्वनीद्वारे डॉक्टरांचा मोफत सल्ला दिला जातो. रुग्णाला न तपासता दूरध्वनीद्वारे दिला जाणारा हा वैद्यकीय सल्ला घातक ठरू शकतो. तसेच, ई-प्रिस्क्रिप्शनही दिले जाते. त्यानंतर ऑनलाइन औषधे पाठविली जातात. ऑनलाइन औषधांवर घसघशीत सवलत देण्यात येते. ऑनलाइन मिळणारे हे ई-प्रिस्क्रीप्शन बनावट असण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रिस्क्रीप्शनच्या मदतीने औषधे घेणे धोकादायक ठरू शकते.

न्यायालयीन आदेशाचा अवमान

ई-फार्मसी संदर्भात नियम निश्चित होईपर्यंत औषधांची बेकायदा किंवा परवानगीशिवाय विक्री करण्यास बंदी घालण्यात यावी, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले आहेत. डिसेंबर 2018 मध्ये उच्च न्यायालयाने औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 आणि फार्मसी कायदा, 1948 अनुसार औषधांची ऑनलाईन विक्री थांबविण्याचा आदेश पारित केला होता. मात्र हे आदेश झुगारून सर्रास ऑनलाइन औषध विक्री सुरु आहे. झोपेच्या गोळ्या देखील यापूर्वी ऑनलाइन विकल्या जात होत्या. मात्र, विविध ऑनलाइन वेबसाईटवर ’सर्च’ केल्यानंतर या गोळ्यांसमोर सध्या ’नॉट फॉर सेल’ म्हणून लिहिले असल्याचे पाहण्यास मिळते.

महिलांनी गर्भपाताच्या गोळ्या या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेणे गरजेचे आहे. मात्र, या गोळ्या ऑनलाइन सहजपणे मिळत असल्याने ही बाब धोकादायक आहे. त्याशिवाय, ऑनलाइन मिळणारे कोडीनयुक्त खोकल्याचे औषध व्यसनाला निमंत्रण देऊ शकते. ई-फार्मसीद्वारे मिळणार्या ऑनलाइन औषधांना आमचा विरोध आहे. ही औषधे वैध आहेत का, हे कसे तपासणार ? ऑनलाइन दिले जाणारे ई-प्रिस्क्रीप्शन बनावट देखील असु शकते.

-रवी पवार, अध्यक्ष,
पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशन.

ऑनलाइन गर्भपाताच्या गोळ्या मिळत आहेत, ही बाब धोकादायक आहे. त्याचप्रमाणे, ऑनलाइन दिले जाणारे ई-प्रिस्क्रीप्शनदेखील रुग्ण न तपासता दिले जात असल्याने त्यालाही अर्थ नाही. ऑनलाइन औषध विक्रीवर नियंत्रण यायला हवे.

– गिरीश बाफना, औषध विक्रेते

डॉक्टर प्रिस्क्रिप्शनशिवाय ऑनलाइन औषध विक्री केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरात 4 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये 1 गुन्हा कोल्हापूर येथे तर, 3 गुन्हे वाकड पोलिस ठाण्यात दाखल केले. झोपेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या, कोडिंगयुक्त खोकल्याचे औषध यांच्या ऑनलाइन विक्रीला प्रतिबंध आहे. त्यामुळे ही औषधे ऑनलाइन उपलब्ध करून देणार्या वेबसाईटवर डमी ऑर्डर टाकून त्यामध्ये कोणी औषधे पाठविल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येते.

– श्याम प्रतापवार, सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन विभाग.

हेही वाचा

सांगली: विजय ताड खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक करण्यासाठी उपोषणाचा इशारा

कच्च्या हळदीचा वापर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अधिक लाभदायक

Maharashtra Politics : भाजप उमेदवार तयार; भिस्त शिंदे गटावर

Back to top button