सांगली: विजय ताड खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक करण्यासाठी उपोषणाचा इशारा

सांगली: विजय ताड खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारास अटक करण्यासाठी उपोषणाचा इशारा

जत: पुढारी वृत्तसेवा : जत नगरपरिषदेचे भाजपचे विरोधी पक्षनेते विजय ताड यांच्या निर्घृण हत्याप्रकरणात माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांचा सहभाग आहे. सावंत यांना अटक करण्यास पोलिसांना अपयश आले आहे. फरार उमेश सावंत यास अटक करावी, अन्यथा येत्या ७ डिसेंबररोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा विजय ताड यांचे बंधू, भाजप नेते विक्रम ताड यांच्यासह ताड कुटुंबिय व समर्थकांनी दिला आहे.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विजय शिवाजीराव ताड यांचा आठ महिन्यांपूर्वी खून झाला आहे. तरीही या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी उमेश जयसिंग सावंत यास पोलिसांनी अद्यापपर्यंत अटक केलेली नाही. यापूर्वीही खून होऊन चार महिने झाल्यावर मुख्य फरार आरोपीस तत्काळ अटक करावी, म्हणून दि. १७ जुलैरोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्यावेळी पोलीस अधिकारी यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांचे समवेत चर्चा करुन एक महिन्याच्या आत फरार आरोपीस अटक करतोय, आम्हास वेळ द्या, असे सांगितले होते. त्यामुळे तिसऱ्या दिवशी उपोषण स्थगित केले होते.

आज त्यास चार महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी, फरार आरोपीस अटक केली नाही. फरार आरोपीस अटक करण्याबाबत पोलिसांना काहीही गांभीर्य नाही. तसेच फरार आरोपीचे जतमधील सहकारी सोशल मीडियावर फरार आरोपीचा फोटो स्टेटसला ठेऊन दहशत माजवित आहेत. व आमच्या कुटुंबियांना संपवून टाकण्याच्या धमक्या ऐकावयास मिळत आहेत. त्यामुळे आमचे संपुर्ण कुटुंब भयभीत आहे. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्याची मागणी विक्रम ताड यांनी केली आहे.

हेही वाचा 

logo
Pudhari News
pudhari.news