Maharashtra Politics : भाजप उमेदवार तयार; भिस्त शिंदे गटावर | पुढारी

Maharashtra Politics : भाजप उमेदवार तयार; भिस्त शिंदे गटावर

चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर

भाजपकडून तीन मातब्बर उमेदवार कोल्हापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपची सगळी भिस्त ही शिवसेना शिंदे गटावर आहे. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले विद्यमान खासदार संजय मंडलिक शिंदे गटात गेल्याने जागा वाटपात शिंदे गट काय भूमिका घेणार, यावर भाजपची राजकीय दिशा ठरणार आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने पहिल्यांदाच ठसा उमटविला. यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचीच कायम सत्ता राहिली. 1980 पासून काँग्रेसच्या तिकिटावर उदयसिंहराव गायकवाड व 1999 पासून राष्ट्रवादीच्या तिकिटावर सदाशिवराव मंडलिक यांनी बाजी मारली. काँग्रसचे गायकवाड 1996 पर्यंत तर राष्ट्रवादीचे मंडलिक 2009 पर्यंत खासदार राहिले. 2009 साली त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आणि अपक्ष म्हणून निवडून आले व काँग्रेसला पाठिंबा दिला. 2014 मध्ये राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक खासदार झाले व 2019 मध्ये शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार संजय मंडलिक निवडून आले. काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी त्यांना उघडपणे मदत केली. ‘आमचं ठरलंय’ ही टॅगलाईन तेव्हा चर्चेचा विषय ठरला.

महायुतीच्या जागावाटप बैठकीकडे लक्ष

शिवसेनेेचे खासदार संजय मंडलिक आता शिवसेना शिंदे गटात आहेत. ज्या खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला त्यांनी प्रवेश करण्यापूर्वी काही ना काही तरी कमिटमेंट घेतली असणार. त्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांची जोवर जागा वाटपाची बैठक होत नाही तोवर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार हे ठरणार नाही. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असली तरी महायुतीचा उमेदवार कोण हे ठरलेले नाही.

भाजपने कोल्हापूर लोकसभा अद्याप लढविलेली नाही

यापूर्वी कधीही भाजपने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली नाही. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून भाजपने प्रयत्न केला पण यश आले नाही. 2014 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना भाजपने पाठिंबा दिला होता. हाच काय तो एकमेव अपवाद. आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा भाजपमध्ये आहे. पक्षाच्या पातळीवर शाहू सहकार समूहाचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांचे नाव घेतले जात असले, तरी ते कागलमधून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

Back to top button