राज्यात तालुका पातळीवर ७५ नाट्यगृहे उभारणार: सुधीर मुनगंटीवार | पुढारी

राज्यात तालुका पातळीवर ७५ नाट्यगृहे उभारणार: सुधीर मुनगंटीवार

चिपळूण: पुढारी वृत्तसेवा: नाट्यगृहे निर्जीव इमारती नाहीत, तर महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा पुढे नेणाऱ्या या वास्तू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने तालुका पातळीवर येत्या दोन वर्षात नवी ७५ नाट्यगृहे उभारण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात रत्नागिरी केंद्राची ६२वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा पार पडत आहे. शनिवारी या स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी दृकश्राव्य माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांनी कलाकार व उपस्थित रसिकांशी संवाद साधला. सांस्कृतिक विभागाचे रवींद्र नाट्यगृह हे एकमेव नाट्यगृह आहे. बाकी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची नाट्यगृहे आहेत. त्यामुळे आता सांस्कृतिक विभागाकडून महाराष्ट्र शासनाच्या वतीने ७५ नवी नाट्यगृह तालुका पातळीवर उभी केली जातील, असे सांगताना ६२व्या राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व कलाकार, तंत्रज्ञांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र राज्य गीताने या उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्येष्ठ रंगकर्मी कांता कानिटकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी रंगकर्मी भाऊ कार्ले, परीक्षक नरेंद्र आमले (पुणे), सुधीर सवेकर (औरंगाबाद), सौ. प्रतिभा नागपुरे-तेटू (अमरावती), लांजातील रंगकर्मी राजेश गोसावी, अभय दांडेकर आदी उपस्थित होते.

रंगकर्मी कांता कानिटकर यांनी माणसाला नाटकाची लूत लागली, तर ही लूत जगण्याची नवी उमेद देते, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे समन्वयक नंदू जुवेकर यांनी केले.

शनिवार दि. २५ नोव्हेंबर ते शनिवार दि. ३ डिसेंबर, अशी ही प्राथमिक फेरी सुरू राहाणार आहे. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. शनिवारी पहिल्या दिवशी कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघाचे केदार देसाई लिखित व प्रसाद धोपट दिग्दर्शित अशुद्ध बीजापोटी हे नाटक सादर झाले.

या वेळी रंगकर्मी डॉ. प्रशांत पटवर्धन, दिलीप आंब्रे, अजय यादव, मंगेश डोंगरे, योगेश बांडागळे, संजय कदम, उदय पोटे, रत्नागिरीतील नाट्य संयोजक दत्तात्रय केळकर, छाया पोटे, अभय दांडेकर, संजय सरदेसाई आदी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button