रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : भाताच्या वाणांवर फिलिपाईन्समध्ये जाऊन संशोधन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अलीकडेच फिलिपाईन्स स्थित आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था (ईरी) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्यादरम्यान भाताच्या संशोधनासंदर्भात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार आता ही संधी प्राप्त होणार आहे.
विविध स्थानिक वाणांचे संकलन, वैशिष्ट्य सुधारणा त्याचबरोबर अधिक उत्पन्न देणार्या जाती, अति ताण सहन करणार्या जाती तसेच विविध किडी व रोगांना बळी पडणार्या जातींवर संशोधन फिलीपाईन्समध्ये जाऊन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने उत्पादित होत असलेल्या भात पिकावर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करून आतापर्यंत जमिनीच्या प्रकारानुसार एकूण 35 वेगवेगळ्या अधिक उत्पन्न देणार्या जाती विकसित केल्या आहेत. यामध्ये सह्याद्री 9 ते 5 या जातींचाही समावेश होतो. या करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, शैक्षणिक आणि संशोधनासाठी बाह्यस्रोताची उपलब्धता आणि या संदर्भाने विविध प्रकल्प राबविणे आता सहज शक्य होणार आहे.
हा सामंजस्य करार करण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्जत येथील भात पैदासकार डॉ. भरत वाघमोडे यांनी पुढाकार घेतला. करारानुसार जलद संकरीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या घटकांचा संशोधनात समावेश आहे. त्यामुळे विद्यापीठातील भातावर संशोधन करणार्या शास्त्रज्ञांना, आचार्य पदव्युत्तर आणि विद्यार्थ्यांना फिलिपाईन्स येथे जाऊन संशोधन करण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे.