नांदेड : १० हजाराची लाच घेताना नायगाव उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याला अटक | पुढारी

नांदेड : १० हजाराची लाच घेताना नायगाव उपनिबंधक कार्यालयातील अधिकाऱ्याला अटक

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : नायगाव तालुका उपनिबंधक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक बाबुराव चत्रु पवार याला वेअर हाऊसच्या नुतनीकरणासाठी १० हजाराची लाच घेताना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. वेअर हाउसचा परवाना नुतणीकरण करण्यासाठी पवार याने तक्रारदाराकडे लाच मागितली होती. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक एस. पवार, श्रीमती स्वप्नाली धुतराज, गंजेद्र जिंरमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संबंधित बातम्या : 

मागील अनेक महिन्यांपासून तालुका उपनिबंधक कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत होत्या. अलिकडच्या काळात नायगाव तालुका हा भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाले आहे. या कार्यालयातील कामकाज व लाचखोरीबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या. एसीबीच्या ट्रॅपने याला पुष्टी मिळाली आहे. या कार्यवाही बाबत कार्यालयातील सर्वच अधिकारी मोबाईल बंद ठेवून मौन बाळगून आहेत.

या प्रकरणाची मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार हे रिध्दी अॅग्रोवेअर हाउसवर मागील ३ वर्षापासून वॉचमन आहेत. त्यांच्या मालकाने त्यांना वेअर हाउसचा परवाना नुतणीकरण करण्याबाबत सांगितले असता, तक्रारदार यांनी सहाय्यक निबधंक सोसायटी कार्यालय, नायगाव येथे जावून रितसर शासकीय शुल्क भरून, त्याची प्रत सहाय्यक निबंधक सोसायटी कार्यालय, नायगाव येथील सहकार अधिकारी बाबुराव पवार यांना दिली. तेव्हा लोकसेवक बाबुराव पवार यांनी मालकाकडून १० हजार रुपये घेवून या नंतरच काम होईल असे म्हणून दहा हजार रूपयाची मागणी केली. यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली. २० नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी पाठविले असता, आरोपी लोकसेवक पवार यांनी तुमच्या मालकाला घेवून या असे सांगितले. शुक्रवारी (दि. २४) तक्रारदार व त्याचे मालक यांना पवार यांची भेट घेण्यासाठी पाठविले असता, पवार यांनी पंचासमक्ष वेअर हाउसचे परवान्याचे नुतणीकरणासाठी १० हजार रुपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

हेही वाचा : 

 

 

Back to top button