

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : नायगाव तालुक्यातील मांजरम येथे २४ व २५ नोव्हेंबर रोजी तबलिगी जमातच्या वतीने इज्तेमाची तयारी सुरू असतानाच इस्तेमाच्या परवानगीसाठी नायगाव पोलीस ठाण्यात अर्जही करण्यात आला. परंतु, सदर इज्तेमाला सुन्नी जमातचा विरोध झाला आणि तहसील समोर पाच दिवस उपोषण करण्यात आले. 23 नोव्हेंबर रोजी पोलीस उपअधीक्षक हनपुडे पाटील व माजी आ.वसंत चव्हाण यांच्या यशस्वी शिष्टाईने उपोषण माघार घेतल्याने हा वाद संपुष्टात आल्याची घटना घडली आहे.
यापूर्वी मांजरम येथे सुन्नी व वहाबी असा वाद बऱ्याच वेळा निर्माण होऊन हाणामारीची घटना घडल्या होत्या. यामध्ये अनेकजण गंभीर जखमी झाले होते. यामुळे परस्पराविरोधात गुन्हाही नोंद झालाहोता तसे नायगाव पोलीस ठाण्यात नोंदही आहे. या वेळी कार्यक्रम रद्द करण्याची मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून तहसील कार्यालय नायगाव येथे उपोषण चालू होते. यामुळे वातावरण तापले होते. मांजरम येथे होणाऱ्या तबलिगी जमातच्या इज्तेमाला परवानगी देऊ नये, यासाठीचे निवेदन नायगावच्या तहसीलदारांना देवून सुन्नी समाज बांधवाने लोकशाही मार्गाने मागणी करत बाजार पेठ ही बंद केली होती.
नायगाव तालुक्यात ९५ टक्के सुन्नी जमातचे मुस्लिम बांधव आहेत. मांजरम च्या कार्यक्रमाला कडाडून विरोध होत होता. मांजरममध्ये सुत्री जमातीच्या लोकांनी डोक्यावर पांढरा कपडा बांधून मोर्चा काढला व प्रशासनाने तबलिगी जमातीच्या इज्तेमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. सोमवारपासून मांजरम व नायगाव तहसील कार्यालय अशा दोन ठिकाणी बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले होते. यावेळी बिलोलीचे उपविभागिय अधीक्षक हनपुडे पाटील व माजी आ.वसंत चव्हाण यांनी सुन्नी पंथीय याना समजावून सांगून या प्रकरणातून माघार घेण्याची विनंती केली या नुसार नायब तहसीलदार विजय नरवाडे,उपअधीक्षक हनपुडे पाटील,पो.नि.जयप्रकाश गुट्टे व पत्रकार बाळासाहेब पांडे यांच्या समक्ष उपोषण सोडण्यात आले.या मुळे सिया सुन्नी वाद संपुष्टात आला असून 24 व 25 रोजी होणारा कार्यक्रमाचा मार्ग मोकळा झाला.