कोल्हापूर: शाहूवाडीत अनाथ मुलांनी हुबेहूब साकारला सिंधुदुर्ग किल्ला | पुढारी

कोल्हापूर: शाहूवाडीत अनाथ मुलांनी हुबेहूब साकारला सिंधुदुर्ग किल्ला

सुभाष पाटील

विशाळगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या व शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती शाहूवाडी (चनवाड) येथील आश्रम शाळेतील अनाथ मुलांनी साकारली. त्यांनी देहभान विसरून १५ दिवसांच्या अथक प्रयत्नातून १५ बाय १५ फूट आकाराचा सिंधुदुर्ग हा जलदूर्ग हुबेहूब तयार केला. त्यांना संस्थेचे सचिव दीपक बुचडे, जगदीश बुचडे यांचे मार्गदर्शन लाभले.

शाहूवाडी केंद्रीय आश्रम शाळेत वंचित, अनाथ, गरीब या घटकातील मुले शिक्षण घेत आहेत. मुले आपापल्या घरी दिवाळी साजरी करत असताना येथील मुले सचिव दीपक बुचडे यांच्या छायेखाली शाळेतच राहून गोड दिवाळी साजरी करत आहे. येथील मुलांनी १५ दिवस मेहनत घेऊन बनविलेल्या हुबेहुब सिंधुदुर्गची प्रतिकृती पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. या किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, किल्यावरील हुबेहूब बुरुज, प्रवेशद्वार, माची, गोड्या पाण्याची विहीर, शिवराज्येश्वर मंदिर, शिव मंदिर, धान्य व दारुगोळा कोठार, गुप्त दरवाजा, राजमहाल, विहीर, मंदिर, किल्ल्याच्या चारही बाजूने अथांग समुद्र आदी वास्तू किल्यात दाखविल्या आहेत.

दगड, माती, रेती, पाणी आदींचा वापर करून सुमारे १५ बाय १५ फूट लांबीच्या या किल्ल्याच्या उभारणीला १५ दिवस लागले. किल्याची पाहणी करण्यासाठी येणाऱ्या इतिहासप्रेंमीकडून या अनाथ, वंचित मुलांचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांचा अभ्यास करता यावा, त्यांच्यामध्ये इतिहास व भूगोलाची आवड निर्माण व्हावी, शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने शाहूवाडीत किल्ला स्पर्धा आयोजित केल्या असून या स्पर्धेसाठी सहभाग घेणार असल्याचे मुलांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button