पंतप्रधान मोदी यांना गोव्याचा दिवाळी फराळ; विश्वजीत राणे यांचा पुढाकार | पुढारी

पंतप्रधान मोदी यांना गोव्याचा दिवाळी फराळ; विश्वजीत राणे यांचा पुढाकार

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी; पुढारी वृत्तसेवा : वोकल फॉर लोकल हा पंतप्रधान मोदी यांचा उपक्रम आहे. या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी स्वयंसाहाय्य गटांच्या महिलांनी तयार केलेले दिवाळीचे खाद्यपदार्थ पंतप्रधान मोदी यांना पाठवले जाणार आहे, अशी माहिती आज (दि.११) महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

मंत्री राणे यांनी आज (दि.११) दोनापावला येथील स्वत:च्या बंगल्याच्या प्रांगणात राज्यभरातील निवडक स्वयंसाहाय्य गटांच्या महिलांना बोलावून घेतले.  या महिलांनी तयार केलेले दिवाळीचे खाद्यपदार्थ सोबत आणण्यासही त्यांनी सांगितले. त्यानंतर या महिलांना त्यांनी  वोकल फॉर लोकल उपक्रमाची माहिती दिली. तसेच गोव्यातील खाद्यपदार्थ इतरत्र कसे पाठवले जाऊ शकते, याचेही मार्गदर्शन राणे यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना राणे म्हणाले, ‘वोकल फॉर लोकल’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभावी उपक्रम असून स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तूंचीच खरेदी लोकांनी करावी, हा त्यामागचा हेतू आहे. स्वयंसाहाय्य गटांनी तयार केलेल्या उत्पादनांसाठी प्रेरणा आणि एक मोठे व्यासपीठ प्रदान करण्याचा उद्देश आहे. गोव्यातील काही निवडक स्वयंसाहाय्य गटांनी अस्सल गोवा दिवाळी मिठाई आणि चवीने भरलेला हॅम्पर तयार केला आहे. जो ते पंतप्रधान मोदी पाठवणार आहेत. हेच या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या अनोख्या संधीने महिला सक्षमीकरणाचा एक उल्लेखनीय क्षण साध्य होणार असल्याचे राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

या उत्पादनांसाठी बाजारपेठ प्रस्थापित करणे, या महिलांना स्वत:च्या पायांवर उभे राहण्यास साहाय्य करणे आणि शाश्वत उपजीविका साध्य करण्याचे साधन उपलब्ध करणे हे आपले ध्येय आहे, असे सांगून लोकांनी पंतप्रधानांच्या ‘वोकल फॉर लोकल’ उपक्रमात सहभागी व्हावे व स्थानिकांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थासह वस्तू खरेदीला प्राधान्य द्यावे, असेही आवाहन मंत्री राणे यांनी यावेळी केले.

हेही वाचा : 

Back to top button