यंदाची दिवाळी गुरूवारपासून सुरू झाली आहे. नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबर रोजी रविवारी एकाच दिवशी आलेले आहे. मधे एक दिवस सोडून 14 नोव्हेंबर रोजी मंगळवारी दिवाळी पाडवा आणि दुसर्या दिवशी बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे.
नरकासुराने 16 हजार 108 स्त्रियांना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रियांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
शरद् ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधिकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणार्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते.
शेतकर्यांसाठी ज्याप्रमाणे मार्गशीर्षातील वेळा अमावास्या शुभ आहे, त्याप्रमाणे व्यापारी वर्गासाठी आश्विनातील अमावास्या शुभ आहे. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, शोभा, आनंद आहे अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाचे दिवशी घर, दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते.
नमस्ते सर्वदेवानां वरदाऽसि हरिप्रिये ।
या गतिस्त्वत्प्रपन्नानां सा मे भूयात् त्वदर्चनात् ॥
अशी लक्ष्मीची प्रार्थना करावी आणि
धनदाय नमस्तुभ्यं निधिपद्माधिपायच ।
भवन्तु त्वत्प्रसादेन धनधान्यादिसम्पदः ॥
अशी कुबेराची प्रार्थना करावी. यापूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात.
लक्ष्मीपूजन मुहूर्त (12 नोव्हेंबर 2023, रविवार)
दुपारी 1:45 ते 3:10, सायं. 6:00 ते रात्री 11:00
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) – (14 नोव्हेंबर 2023, मंगळवार)
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरू होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरू होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचे ही आयुष्य वाढते. (Diwali 2023 Lakshmi Pujan Muhurat)
पहाटे 2:30 ते 5:30, सकाळी 6:45 ते 7:35, सकाळी 10:55 ते दुपारी 1:45
नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. मात्र या तीन दिवसांना जोडून येणारी भाऊबीज सुद्धा दिवाळीच्या दिवसात गणली जाते. या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे असे पुराणात सांगितले आहे.
दिवाळीच्या या चार दिवसात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करावयाचा असल्याने दीपमाळ, आकाशदिवे, दिव्यांची रोषणाई करून दीपोत्सव केला जातो. म्हणून या चार दिवसांना दीपावली किंवा दिवाळी असे म्हटले जाते.
हे ही वाचा :