Pimpri Crime News : रुग्णाची फसवणूक; डॉक्टरवर गुन्हा | पुढारी

Pimpri Crime News : रुग्णाची फसवणूक; डॉक्टरवर गुन्हा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन एकाने रुग्णालयाचे बिल भरले. दरम्यान, विम्याचे पैसेदेखील रुग्णालयाकडे जमा झाले. मात्र, ते पैसे परत न करता डॉक्टरने रुग्णाची फसवणूक केली. हा प्रकार 22 सप्टेंबर ते 21 डिसेंबर 2022 या कालावधीत केअर लाईफ लाईन हॉस्पिटल, थेरगाव येथे घडला.

डॉ. किरण किसन थोरात (40) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी विनोद राजेंद्र जाधव (30, रा. डुडुळगाव, ता. हवेली) यांनी गुरुवारी (दि. 9) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांना थंडी ताप आल्याने ते 22 सप्टेंबर रोजी थेरगाव येथील केअर लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची सर्व कागदपत्रे दाखवली.

त्या वेळी जाधव यांचा अ‍ॅडमिट कालावधीतील सर्व खर्च पॉलिसीमधून होईल, असे सांगण्यात आले.
दरम्यान, डिस्चार्ज देताना आरोपी डॉक्टरने जाधव यांना त्यांचा कॅशलेस विमा क्लेम झाला नसल्याचे सांगितले. तसेच, बिल देण्यासाठी जिमनी फायनान्स कंपनीकडून कर्ज करून 82 हजार 495 रुपये बिल भरण्यास सांगितले. त्यासाठी जाधव यांच्याकडून पॅनकार्ड, आधारकार्ड अशी कागदपत्रे घेऊन इतर कागदपत्रांवर जाधव यांच्या सह्या घेतल्या.

दरम्यान, जाधव यांना विम्याचे पैसे मिळाल्यावर त्यांनी 61 हजार 900 रुपये ऑनलाईन पाठवले. अशा प्रकारे आरोपीकडे एकूण एक लाख 44 हजार 495 रुपये जमा झाले. बिलाची रक्कम वगळून 73 हजार 599 रुपये माघारी न देता डॉक्टरने फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

हेही वाचा

 

Back to top button