छत्रपती संभाजीनगर : दोन दरोड्यांनी जिल्हा हादरला; गोळीबारानंतर ७ जण गजाआड | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : दोन दरोड्यांनी जिल्हा हादरला; गोळीबारानंतर ७ जण गजाआड

वैजापूर/शिऊर/गारज, पुढारी वृत्तसेवा :  मनेगाव (ता. वैजापूर) आणि कानडगाव (ता. कन्नड) येथील शेतवस्तीवर दरोडेखोरांनी बुधवारी (दि.८) हैदोस घातला. दोन्ही कुटुंबातील महिला, मुलांसह पाच जणांचे दरोडेखोरांनी डोके फोडून सोन्या – चांदीच्या दागिन्यांसह तब्बल साडेतीन लाखांचा ऐवज लुटला. पहिला दरोडा बुधवारी (दि.८) रात्री ११.३० वाजता मनेगाव शिवारात घातला. त्यानंतर त्याचदिवशी मध्यरात्री दीड वाजता दुसरा दरोडा कानडगाव शिवारात टाकला.

दरम्यान, शिऊर पोलिसांनी पाठलाग करून दोन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पसार झालेले दरोडेखोर जानेफळ शिवारात लपल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी सहा राऊंड फायर करून पाचजणांना आज (दि.११) अटक केली. यात एक फौजदार व हवालदार जखमी झाले तर एका दरोडेखोराला गोळी लागल्याने तो जखमी अवस्थेत सापडला, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली.

मनेगाव शिवारात ११.३० वाजता धुमाकूळ

मनेगाव शिवारात गट क्र. ८३ मध्ये शेतवस्तीवर विष्णू पंढरीनाथ सुराशे (५०) हे आपल्या परीवारासह राहतात. बुधवारी रात्री ९ वाजता मुलगा रूपेश (२०), पत्नी हिराबाई आणि विष्णू सुराशे हे तिघेजण जेवण करून घराबाहेर झोपले होते. यावेळी तीन दरोडेखोरांनी रात्री ११.३० च्या सुमारास रुपेशवर हल्ला केला. त्याच्या डोक्यात चाकूने वार करून लोखंडी गजाने मारहाण केली. व त्याला गंभीर जखमी केले. मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून वडील विष्णु सुराशे त्याच्या मदतीला धावले. तोच दरोडेखोरांनी त्यांच्याही पाठीत लोखंडी रॉडने जोरदार फटके लगावले. त्यानंतर हिराबाई यांनाही बेदम मारहाण करून चाकूचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील सर्व दागिने हिसकावून घेतले. जवळपास अर्धा तास दरोडेखोरांचा हैदोस सुरु होता. यावेळी दरोडेखोरांनी ५० हजारांचे दागिने लुटले.

सुराशे कुटुंबियांच्या किंकाळ्या ऐकून साकेगाव, मनेगाव आदी गावातील लोकांनी त्यांच्या शेतवस्तीकडे धाव घेतली. मात्र. तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. घटनास्थळी धाव घेत पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांनी पाहणी केली.  त्यानंतर शिऊर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

कानडगाव शिवारातील शेतवस्तीही टार्गेट

मनेगाव शिवारातून पसार झालेल्या दरोडेखोरांनी मध्यरात्रीनंतर पहाटे दीड वाजता कन्नड तालुक्यातील कानडगाव शिवारातील नलावडे वस्ती टार्गेट केली. देविदास लक्ष्मण नलावडे (५०) हे पत्नी सुनिता यांच्यासह राहतात. त्यांची दोन्ही मुले दिवाळीनिमित्त चार दिवसांपूर्वीच घरी आली होती. नलावडे दांपत्य ज्या ठिकाणी झोपलेले होते. तेथे जाऊन दरोडेखोरांनी काठ्यांसह चाकूने जीवघेणा हल्ला केला. यात देविदास नलावडे आणि त्यांची पत्नी सुनीता या दोघांचे डोक फुटले. व दोघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर दरोडेखोरांनी सुनीता यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले. दागिन्यांसह घरातील लॅपटॉप, मोबाइल असा जवळपास २ लाख ८० हजार रुपायांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला. याप्रकरणी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर घटनास्थळी सहायक निरीक्षक अमोल मोरे यांनी भेट दिली.

आठ ठिकाणी नाकाबंदी; शिऊर पोलिसांनी दोघांना पकडले

दरोड्याची माहिती मिळाल्यावर शिऊर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप पाटील, अंमलदार भरत कमोदकर, विशाल पैठणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोर एका वाहनातून पसार झाल्याचे समजल्यावर कन्नड आणि वैजापूर तालुक्यात आठ ठिकाणी नाकाबंदी लावली. साकेगाव येथील नागरिकांनी २:३० च्या सुमारास एक वाहन शिऊर बंगल्याकडे गेल्याची माहिती दिली.

पोलिसांनी पाठलाग करीत पहाटे तीनच्या सुमारास शिऊर येथील पाण्याच्या टाकीजवळ टाटा एसी (क्र.एमएच १७, बीवाय ९२८९) वाहन अडविले. फळांची गाडी असल्याचे त्यांनी सांगितले, पण एकाच्या हाताला ओरखडलेले दिसले. संशयावरून तपासणी केली असता गाडीतील टमाट्याच्या कॅरेटखाली दरोडेखोर लपून बसल्याचे दिसले. त्यांनी तलवार, चाकूच्या धाकावर पोबारा केला. तेथे पोलिसांनी पाठलाग करून सागर रतन भोसले (२०) आणि रावसाहेब भिमराव पगारे (३५, दोघे रा. पडेगाव, ता. कोपरगाव) यांना धारदार हत्यारासह पकडले.

हेही वाचा :

Back to top button