बालदिन | पुढारी

बालदिन

त्या सोसायटीत बालदिन साजरा करण्याची गडबड सुरू होती. नेमके काय कार्यक्रम करावेत, याचे नियोजन सुरू होते. चेअरमन म्हणाले, ‘गेली दोन वर्षे सोसायटीत बालदिनाचा कार्यक्रम होऊ शकला नाही, याची खूप रुखरुख वाटते. टाळेबंदीमुळे आणि नंतर शाळा लवकर सुरू न झाल्यामुळे पोरं घरातच होती. त्याचा त्यांना खूप त्रास झाला आणि पोरांच्या घरात असण्यामुळे घरातली माणसे किती वैतागली हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.

तारखेने आपण बालदिन साजरा करतो आहोत; पण गेली दोन वर्षे आपण बालदिन साजरा केला, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. कारण, मुलांचे ऐकण्याखेरीज आपल्याकडे पर्यायच नव्हता. असो, यावेळी वेगळे काय करता येईल? आपल्या सोसायटीचा बालदिन हटके झाला पाहिजे. तसा तो साजरा झाला, तरच पेपरात चांगल्या बातम्या छापून येतात.’ एक सदस्य उभे राहून म्हणाले, ‘या दोन वर्षांत जी मुले शहाण्यासारखी वागली, त्यांचा आपण विशेष सत्कार करूयात.’

दुसरे सदस्य हात वर करत म्हणाले, ‘मला शहाण्यासारखं वागणं हा निकषच मान्य नाही. पोरांनी पोरांसारखंच वागलं पाहिजे, तरच ती मुले! पोरं आणि राजकारणी यांच्याकडून शहाण्यासारखे वागण्याची अपेक्षाच करणेच चुकीचे आहे. बरोबर ना?’ चेअरमन म्हणाले, ‘आपण मुलांसाठी लेखन करणार्‍या लेखकांचा सन्मान करूयात. ते लिहितात; पण त्यांचा सन्मान कुणी करत नाही. त्यांनी लिहिलेले साहित्य बालक वाचत नाहीत आणि पालक त्यांना वाचून दाखवत नाहीत.

संबंधित बातम्या

डोक्यावरचे बाल जायची वेळ आली तरी त्यांची दखल कुणी घेत नाही आपण ती घ्यायला हवी. कशी वाटते आहे ही कल्पना?’ त्यावर एक सदस्य नाराजीने म्हणाले, ‘हे लेखक लहान मुलांसाठी लिहिणारे असले, तरी त्यांचे रागलोभ खूप मोठे असतात. अपेक्षाही जास्त असतात. आपली पोरं कॉम्प्युटर, मोबाईलशी खेळणारी आहेत. हे लेखक मात्र चिऊकाऊच्या गोष्टींच्या पुढे जायलाच तयार नाहीत. वयाने मोठे झाले, तरी ते त्यांच्याच बालपणातून अजून बाहेर पडायला तयार नाहीत.

बघा बाबा तुम्हीं काय करायचे ते!’ चेअरमन वैतागून म्हणाले, ‘बालदिन कसा साजरा करावा, या साध्या विषयावरदेखील आपल्या सोसायटीत एकमत होत नाही. कमाल आहे. एकता सोसायटी या आपल्या सोसायटीच्या नावाला साजेसे काम आपण नेहमी करीत असतो.’ त्यावर ज्येष्ठ सदस्य म्हणाले, ‘इतकं वैतागून बोलू नका आणि नाराजही होऊ नका. आपल्याला बालदिन वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा आहे ना! माझ्या मनात एक भन्नाट कल्पना आहे. आपण

बालदिन आणि बालिश दिन एकत्र साजरा करूया. बालदिनाच्या निमित्ताने मुलांसाठी विविध स्पर्धा ठेवूयात. कायम बालिश बोलून आपले बालपण न विसरणार्‍या आणि आपले कायम मनोरंजन करणार्‍या आपल्या भागातील राजकारणी मंडळींना बोलावून आपण त्यांचाही सत्कार करूयात. खरी लहान मुले आणि लहान मुलांसारखे वागणारी मोठी राजकारणी माणसे दोघांचेही कौतुक केल्याचे समाधान आपल्याला मिळेल आणि वेगळा कार्यक्रमही होईल.’ त्याला सर्व सदस्यांनी तत्काळ मान्यता दिली.

– झटका

Back to top button