PAK vs NZ Wc 2023 : पावसामुळे पाकिस्तान विजयी, जाणून घ्‍या उपांत्य फेरीचे बदलेले समीकरण | पुढारी

PAK vs NZ Wc 2023 : पावसामुळे पाकिस्तान विजयी, जाणून घ्‍या उपांत्य फेरीचे बदलेले समीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क :  न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार २१ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानने स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. ( PAK vs NZ Wc 2023 ) संघाच्‍या नावावर आठ गूण झाले आहेत. न्‍यूझीलंडचा या स्‍पर्धेतील सलग चाैथा पराभव झाल्‍याने पाकिस्‍तानच्‍या उपांत्‍य फेरी गाठण्‍याच्‍या आशा कायम राहिल्‍या आहेत. मात्र ‘जर-तर’वरच पाकिस्‍तानची पुढील वाटचाल असणार आहे. जाणून घेवूया एकदिवसीय विश्‍वचषक  उपांत्‍य फेरीसाठीच्‍या नव्‍या समीकरणाविषयी…

PAK vs NZ Wc 2023 : पावसामुळे खेळात व्‍यत्‍यय, पाकिस्‍तान विजयी घाेषित

न्यूझीलंडने दिलेल्या 402 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकात अब्दुल्लाह शफिकी स्वस्तात बाद झाला. यानंतर कर्णधार बाबर आझम आणि फखर जमान दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या 196 धावांची भागिदारी निर्णायक ठरली. यामध्ये फखऱ जमानने 81 चेंडूत 126 धावांची खेळी केली. तर कर्णधार आझमने 63 चेंडूत 66 धावांची खेळी केली. सामन्यात वरूण राजाने लावलेल्या हजेरीमुळे सामना दोन वेळा थांबवण्यात आला. यामुळे पाकिस्तानसमोर 19.3 षटकात 182 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्या पाठलाग करताना वरूण राजाने पुन्हा हजेरी लावल्याने डीएलएसचा वापर करत पंचांनी पाकिस्तानला 21 धावांनी विजयी घोषित केले.

आता तिसर्‍या व चाैथ्‍या क्रमांकासाठी चुरस

एकदिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धा अंतिम टप्‍प्‍यात अत्‍यंत राेमहर्षक अवस्‍थेत आली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सर्व सात सामने जिंकत माेठ्या दिमाखात उपांत्‍य फेरीत धडक मारली आहे. भारतापाठाेपाठ या स्‍पर्धेत लक्षवेधी कामगिरी करणार्‍या दक्षिण आफ्रिका संघाने सातपैकी सहा सामने जिंकत आपले सेमीफायनलेचे तिकिट पक्‍के केले आहे. आता या स्‍पर्धेत खरी चुरस तीन व चार क्रमांकासाठी असणार आहे.  स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 33 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत स्पर्धेत सातपैकी पाच सामन्यात विजय मिळवत 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. स्पर्धेतील त्यांचा अंतिम सामना ११ नोव्हेंबर रोजी बांगलादेश विरूद्ध होणार आहे.

उपांत्य फेरीचे बदलेले समीकरण

न्यूझीलंडविरूद्धच्या विजयामुळे पाकिस्तानने गुणतालिकेत अफगाणिस्तानला मागे सोडत पाचव्या स्थानी पोहचले आहेत. तर सामन्यातील पराभवानंतरही न्यूझीलंड चौथ्या स्थानावर कायम आहे. यामध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी आठ सामन्यांपैकी चारमध्ये विजय मिळवला आहे. तर चार सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. चांगल्या नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानावर कायम आहे. आता पाकिस्‍तान आणि न्‍यूझीलंड यांना पुढील सामने जिंकावेच लागणार आहेत. आता ९ नाेव्‍हेंबरला न्यूझीलंडचा सामना श्रीलंकेविरूद्ध तर  पाकिस्‍तानचा ११ नाेव्‍हेंबर राेजी इंग्‍लंड विरूद्ध  सामना हाेणार आहे. या सामन्‍यांच्‍या निकालाकडे दाेन्‍ही संघांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा :

Back to top button