Pune News : पालकांच्या रेट्यापुढे प्रशासन नमले! | पुढारी

Pune News : पालकांच्या रेट्यापुढे प्रशासन नमले!

वारजे : माळवाडी येथील महापालिकेच्या कै. श्यामराव श्रीपती बराटे इंग्लिश माध्यमाच्या शाळेत शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर पालकांनी शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर महापालिकेचा शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर आंदोलन होण्यापूर्वीच या शाळेत सात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालक व माजी लोकप्रतिनिधींनी ’शिक्षक द्या; अन्यथा शाळेला टाळे ठोकू’ असा इशारा शिक्षण विभागाला दिला होता. त्यानुसार मंगळवारी (दि. 31) पालक शाळेत आंदोलन करण्यासाठी जमा झाले असता सात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी आनंद व्यक्त करीत हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

आगामी काळात शिक्षकांची संख्या कमी केली, तर कोणतीही पूर्वसूचना न देता शाळेला टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा या वेळी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी दिला आहे. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व माजी नगरसेवक दिलीप बराटे, माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक सचिन दोडके, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ, माजी नगरसेविका सायली वांजळे-शिंदे आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, माजी नगरसेवक दिलीप बराटे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ व विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह पालकांनी सहा दिवसांपूर्वी शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत शिक्षक नाही मिळाले, तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

 

पालकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शाळेला शिक्षक वाढवून मिळाले आहेत. मात्र, शाळेत पालक मोठ्या संख्येने जमा झाले असतानादेखील एकही अधिकरी उपस्थित नसल्याने प्रशासनाला परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

– प्रदीप धुमाळ,
माजी अध्यक्ष, शिक्षण मंडळ,
महापालिका

शाळेला शिक्षक वाढवून मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. मंगळवारी टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत शिक्षण विभागाने सात शिक्षक वाढवून दिले आहेत.

दिलीप बराटे,
माजी नगरसेवक

शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पालक व माजी लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन पाठपुरावा केला. यामुळे शाळेला सात शिक्षक वाढवून मिळाले आहेत.

– सचिन दोडके,
माजी नगरसेवक

हेही वाचा

Back to top button