Pune News : बाप रे! चारशेपेक्षा जास्त झाडांची कत्तल | पुढारी

Pune News : बाप रे! चारशेपेक्षा जास्त झाडांची कत्तल

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा : खराडी येथील खुळेवाडी परिसरात एका कंपनीने गोदाम उभारण्यासाठी मोकळ्या मैदानातील चारशेपेक्षा जास्त झाडांची कत्तल केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी महापालिकेने संबंधितांना नोटीस पाठवली असून, लवकरच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ 1 चे सहायक उद्यान अधीक्षक गुरुस्वामी तुम्माले
यांनी दिली. खुळेवाडी येथील सर्व्हे क्रमांक 140/1/2 मध्ये एका खासगी कंपनीची मोठी जागा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीच्या आवारात गोदामाचे काम सुरू आहे.

त्यासाठी कंपनीच्या आवारातील झाडांची कत्तल सुरू होती. याबाबत महापालिकेचे वृक्ष अधिकारी आणि सहायक उद्यान अधीक्षकांनी संबंधितांना नोटिसा बजाविल्या. मात्र, कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर महापालिकेने वृक्ष तोड करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे कारवाईसाठी विलंब झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

खुळेवाडी परिसरात संबंधितांनी कंपनीचे गोदाम उभारण्यासाठी चारशेपेक्षा जास्त झाडांची कत्तल झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कंपनीला नोटीस पाठवली होती. मात्र, त्यांनी त्याचा समाधानकारक खुलासा केला नसल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

– गुरुस्वामी तुम्माले,
सहायक उद्यान अधीक्षक (परिमंडळ 1), महापालिका

हेही वाचा

Back to top button