पीडिता, साक्षीदारांसाठी न्यायालयच असुरक्षित ? | पुढारी

पीडिता, साक्षीदारांसाठी न्यायालयच असुरक्षित ?

पुणे : समाजात वावरताना अनेकदा समाजविघातक कृत्ये, अपघात, अन्याय-अत्याचाराच्या प्रसंगांच्या वेळी उपस्थित नागरिक केवळ मूक साक्षीदार बनतात. काही प्रसंगांत पीडितांच्या मदतीला धावण्याची इच्छा असते. पण, कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची भीती वाटते. त्यामुळे पीडितांच्या मदतीसाठी कुणी पुढे येत नाही. काही जण धाडसाने पुढे येतात. मात्र, प्रत्यक्षात न्यायालयात हजर राहिल्यानंतर त्यांना आरोपींसमोर अथवा बाजूला उभे केले जाते. न्यायालयातील या परिस्थितीमुळे पीडिता व साक्षीदारांना आरोपी व त्याच्या कुटुंबीयांच्या दबावाच्या सावटाखालून जावे लागते. या वेळी त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
जनसामान्यांमध्ये कायद्याबाबत जनजागृती होत असल्याने गुन्हेगारांविरोधात साक्ष देण्यासाठी नागरिक साक्षीदार म्हणून हजर राहण्याची संख्या वाढत आहे. मात्र, प्रत्यक्षात जिल्हा व सत्र न्यायालयात जागा नसल्याने पीडितांसह साक्षीदारांना आरोपी व त्याच्या कुटुंबीयांसह कोर्टरूमच्या बाहेर वाट पाहावी लागत आहे. कोर्टरूममधील पुकार्‍यानंतर हजर राहावे लागेल, यामुळे त्यांना कोठेही जाता येत नाही.
त्यामुळे जमिनीवर अथवा बाकड्यावर बसून आरोपी व त्याच्या कुटुंबीयांच्या नजरेच्या दबाखाली वावरावे लागत असल्याचे चित्र आहे. बैठकव्यवस्थेच्या अभावी कोर्टरूमबाहेरच आरोपीबरोबर वाट पाहावी लागत असल्याने पीडिता व साक्षीदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायाच्या अपेक्षेने न्यायालयाची पायरी चढणार्‍या प्रत्येकाची सुरक्षितता निश्चित करणे आवश्यक असताना प्रशासनाचे त्याकडेच दुर्लक्ष होत आहे.

साक्षीदारांसह कुटुंबीय होतात फितूर

न्यायालयात आल्यानंतर आरोपीच्या वकिलांकडून या प्रकरणातील साक्षीदार तसेच पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांना हेरून त्यांच्याशी संपर्क साधला जातो. त्यानंतर न्यायालयात साक्ष देताना संबंधितांकडून चक्क साक्ष फिरवली जाते. न्यायालयात जागा नसल्याने बहुतांश गुन्ह्यांत फितुरीचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे आरोपी निर्दोष सुटत असल्याचे निरीक्षण सरकारी वकिलांकडून नोंदविण्यात आले.

आरोपीसाठी केबिन अन् पीडिता, साक्षीदार ताटकळत उभे

कारागृहात असलेल्या गरजूंना मोफत वकील उपलब्ध व्हावा, यासाठी न्यायालयाच्या मोकळ्या पॅसेजमध्ये कार्यालय उभारण्यात आले आहे. या ठिकाणी असलेल्या केबिनमध्ये जामीन तसेच अन्य गोष्टींसाठी आलेल्या आरोपीच्या कुटुंबीयांना खुर्ची, फॅन लावण्यात आले आहेत. तर, न्यायालयात साक्ष देण्यासाठी आलेले साक्षीदार व कुटुंबीयांना कोर्टरूमबाहेर ताटकळत उभे राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येते.
न्यायालयात हजर झाल्यानंतर साक्षीदारांना सुरक्षित वाटेल असे नियोजन होण्याची आवश्यकता आहे. यामध्ये बैठकव्यवस्थेसह  आवश्यक सोयीसुविधा होणे गरजेचे आहे. त्यामुळे पीडितांसह साक्षीदारांमध्येही न्यायालयीन प्रक्रियेची भीती कमी होऊन ते मदतीसाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी पुढे सरसावतील.
– अ‍ॅड. केतकी उमेश वाघ,
फौजदारी वकील
न्यायालयात हजर झाल्यानंतर पीडितांसह साक्षीदारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन आधार मिळण्याची आवश्यकता आहे. त्यांना खरे बोलण्यासाठी आधार व  धाडस मिळाले नाही, तर साक्षीदार, आरोपी व पीडित ही त्रिमिती मोडून पडेल. यामुळे सत्य कधीच बाहेर पडणार नाही आणि न्यायव्यवस्थेचा उद्देश सफल होणार नाही. न्यायालयात पीडिता व साक्षीदारांसाठी वेगळी बैठकव्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.
– अ‍ॅड. नितीश चोरबेले, 
फौजदारी वकील
हेही वाचा

Back to top button